इराणची ऐतिहासिक आगेकूच

Iran
Iran

मडगाव : लढवय्या इराणने 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आशियाई आव्हान कायम राखताना ऐतिहासिक आगेकूच राखली आहे. स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठताना त्यांनी मंगळवारी दोन वेळच्या माजी विजेत्या मेक्‍सिकोला 2-1 अशा गोलफरकाने नमविले. 

फातोर्डा-मडगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ 16) लढतीत इराणने पहिल्या अकरा मिनिटांत दोन गोल करून बाजू भक्कम केली. नंतर पूर्वार्धातच मेक्‍सिकोने पिछाडी एका गोलने कमी केली, परंतु ते इराणी संघाची आगेकूच रोखू शकले नाहीत. इराणचा हा यंदाच्या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी गोव्यातील मैदान भाग्यशाली ठरले. 
मेक्‍सिकोने ही स्पर्धा 2005 व 2011 मध्ये जिंकली होती, तर 2013 मध्ये ते उपविजेते होते. यावेळी त्यांचा भारतातील मुक्काम लांबला नाही. इराणने 2009 व 2013 मध्ये स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता, त्यानंतर 2015 मधील स्पर्धेसाठी ते पात्र ठरले नव्हते. 2001 मध्ये त्यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले होते. 
पेनल्टी फटक्‍यावर महंमद शरिफी याने सातव्या मिनिटास इराणला आघाडीवर नेले, नंतर अकराव्या मिनिटास अल्लाह्यार सय्यद याने त्यांच्यासाठी दुसरा गोल केला. सय्यदचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. मेक्‍सिकोची पिछाडी 37व्या मिनिटास रॉबर्टो डे ला रोझा याने कमी केली. उपांत्यपूर्व लढतीत इराणची गाठ आता स्पेनशी पडेल. हा सामना 22 ऑक्‍टोबरला कोचीत खेळला जाईल. 

इराणची आजची सुरवात आश्वासक होती. साखळी फेरीतील फॉर्म त्यांनी कायम राखला. सातव्याच मिनिटाल त्यांना पेनल्टी फटका मिळाला. मेक्‍सिकोच्या आद्रियन वास्केझ याने इराणच्या महंमद घादेरी याला गोलरिंगणात धोकादायकरित्या अडथळा आणला. त्या वेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्‍यावर शरिफी याने अजिबात चूक केली नाही. चार मिनिटानंतर इराणच्या खाती आणखी एक गोल जमा झाला. मेक्‍सिकोची बचावफळी विस्कळित झाल्याची संधी साधत अल्लाह्यार सय्यद याने प्रतिस्पर्धी गोलरक्षक सीझर लोपेझ हा जाग्यावर नसल्याची संधी साधली. 

मेक्‍सिकोने दोन गोलांच्या पिछाडीनंतर इराणच्या रिंगणात आक्रमणे केली. 37व्या मिनिटास त्यांना यश मिळाले. रिबाऊंडवर रॉबर्टो रोझा याने इराणचा गोलरक्षक घोलाम झादेह याला चकवा दिला. झादेह याने पहिल्यांदा दिएगो लैनेझ याचा फटका अडविला होता, पण नंतर तो रोझा याला रोखू शकला नाही. मेक्‍सिकोने उत्तरार्धातील खेळात बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु इराणी बचाव भेदण्यास त्यांना यश आले नाही. त्यातच त्यांच्या दिएगो लैनेझ व जैरो टोरेस याचे प्रयत्न असफल ठरले. टोरेसची फ्रीकिक 68व्या मिनिटास गोलपोस्टला आपटल्यावर इराणच्या खेळाडूंनी चेंडूवर ताबा मिळविला. 

अब्बास चामानियन यांच्या मार्गदर्शनाखालील इराणच्या संघात आज कर्णधार महंमद घोबेईशावी नव्हता. निलंबनामुळे तो आजचा सामना खेळू शकला नाही. पहिल्या अकरा जणांत शरिफी याला स्थान मिळाले. मेक्‍सिकोचा बचाव कमजोर असल्याचे काल पत्रकार परिषदेत चामानियन यांनी नमूद केले होते, आज प्रत्यक्षात इराणला प्रतिस्पर्ध्यांच्या कमजोरीला लाभ मिळाला. त्यांचे दोन्ही मेक्‍सिकोच्या बचावातील त्रुटींमुळेच शक्‍य झाले. 54व्या मिनिटास अल्लाह्यार सय्यद फटका गोलरक्षक लोपेझ याने अडविला नसता, तर इराणच्या खाती तिसऱ्या गोलची नोंद झाली असती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com