फुटबॉल प्रगतीसाठी एकच लीग असावी - सुनील छेत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - संघटन पातळीवर इंडियन सुपर लीग आणि आय-लीग यांचे एकत्रीकरण कठिण दिसत असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने फुटबॉलमधील प्रगतीसाठी एकच लीग असण्यास प्राधान्य मिळावे, असे आवाहन केले.

नवी दिल्ली - संघटन पातळीवर इंडियन सुपर लीग आणि आय-लीग यांचे एकत्रीकरण कठिण दिसत असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने फुटबॉलमधील प्रगतीसाठी एकच लीग असण्यास प्राधान्य मिळावे, असे आवाहन केले.

आपली भूमिका अधिक ठळकपणे मांडताना सुनील म्हणाला, ""या वर्षी आम्हाला "फिफा'च्या सर्वच्या सर्व 13 मित्रत्वाचे सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाच्या प्रगतीसाठी ते आवश्‍यक आहे. पण, त्यासाठी देशात फुटबॉलची एकच लीग खेळविली जायला हवी.''

सुनीलने या वेळी बोलताना हे वर्ष आपल्यासाठी चांगले गेल्याचे सांगितले. राष्ट्रीय संघातून खेळताना "सॅफ'चे विजेतेपद मिळाले. बंगळूर एफसीकडून खेळताना "एएफसी' करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली, आयएसएलमध्ये मुंबई सिटीकडून खेळताना उपांत्य फेरी गाठली. या वर्षातील घडामोडींचा त्याने या वेळी आढावा घेतला.

भारतीय खेळाडूने परदेशात क्‍लब फुटबॉल खेळावे का? या प्रश्‍नावर बोलताना सुनील म्हणाला, 'भारतीय खेळाडूंना अशी संधी मिळाली तर खूपच चांगले. वैयक्तिक पातळीवर त्यांना अधिक झपाट्याने प्रगती साधता येईल. गुरप्रीतसिंगला तशी संधी मिळाली आहे. त्याची प्रगती मी पाहिली आहे.''

भारताने विश्‍वकरंडक खेळण्याचे स्वप्न बाळगणे नक्कीच चांगले आहे. पण, ते खूप कठिण आहे, असे सांगून तो म्हणाला, 'विश्‍वकरंडक खेळायला नक्कीच आवडेल. त्यापूर्वी आपल्याला आशियात पहिल्या दहामध्ये स्थान मिळायला हवे. आशियातच पहिल्या दहांत येणे आव्हानात्मक आहे. आशिया करंडकासाठी पात्र ठरण्याचे आपण प्रयत्न करायला हवा आणि तेथील स्थान कायम रहायला हवे. तरच आपल्याला आशियात मानांकन उंचावण्याचा विचार करता येईल.''

एकच लीग खेळविली गेल्यास अधिक संघ आणि अधिक महिने खेळायला मिळतील. त्यामुळे सामने देखील अधिक होतील. सुधारणा करण्यास वाव मिळेल.
- सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार

Web Title: Football League progress should be the same