शांघायची फॉर्म्युला वन धुक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

दोन्ही सराव सत्रे खराब हवामानामुळे रद्द; शर्यत कार्यक्रम बदलण्याची मागणी
शांघाय - धुके, पाऊस आणि ढग खूपच खाली आल्यामुळे फॉर्म्युला वन मालिकेतील शांघाय ग्रां. प्रि. शर्यतीतील सरावाचे सत्र रद्द करण्यात आले. यानंतर लुईस हॅमिल्टनसह अनेक ड्रायव्हरनी शर्यतीचा कार्यक्रम बदलण्याची मागणी केली आहे.

शर्यत कार्यक्रमात शुक्रवारी अधिकृत सराव होतो. त्यात दोन सत्रे असून ती 90 मिनिटांची असतात. पहिले सत्र 22 मिनिटे झाल्यावरच रद्द करण्यात आले, तर दुसरे सत्र पूर्णपणे रद्द झाले. या धुक्‍यामुळे मेडिकल हेलिकॉप्टर निश्‍चित हॉस्पिटलच्या नजीक उतरू शकणार नव्हते.

शर्यतीच्या मार्गापासून रुग्णवाहिका रुग्णालयात 20 मिनिटांत पोचणे अशक्‍य असल्यास ट्रॅकवर सरावासही प्रतिबंध केला जातो. शांघायमध्ये हेच घडले.

पहिल्या सत्रात केवळ 14 ड्रायव्हरनीच सराव केला. संभाव्य विजेता लुईस हॅमिल्टन, मोसमातील पहिली शर्यत जिंकलेला सेबॅस्टियन व्हेटल यांना सरावही करता आला नाही. सराव सत्र रद्द झाल्यामुळे अनेकांची निराशा होणे स्वाभाविकच आहे. आता शनिवारी सरावाचे सत्र घ्यावे, रविवारी सकाळी पात्रता शर्यत आणि संध्याकाळी मुख्य शर्यत घेण्याची सूचना हॅमिल्टनने केली आहे. शनिवारी, तसेच रविवारी चांगल्या हवामानाचा अंदाज आहे. रविवारीही शुक्रवारसारखेच वातावरण असले, तर संयोजक उपचाराची पर्यायी व्यवस्था करेपर्यंत शर्यत सुरू करणार नाहीत.

यंदाच्या शर्यतीनंतर मलेशियाचा गुडबाय
मलेशियात या मोसमातील ऑक्‍टोबरमधील शर्यत होईल. त्यानंतर मलेशियात फॉर्म्युला वन शर्यत होणार नाही. 1999 पासून सेपांग येथे सलग शर्यत होत आहे; पण खालावणारी तिकीट विक्री, देशात शर्यतीचे कमी होणारे चाहते; तसेच पर्यटनास याचा अपेक्षित फायदा न होणे, हे लक्षात आल्यामुळे मलेशिया सरकारने संयोजनास नकार दिला आहे.

Web Title: formula one in fog