वस्तादांचे इमान कुस्तीशी

वस्तादांचे इमान कुस्तीशी

कुस्ती हाच श्‍वास, हेच हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या आयुष्याचे समीकरण ठरले. जगण्यात कधीच घमेंड न बाळगता मातीशी इमान राखत त्यांचा वावर राहिला. ‘डाऊन टू अर्थ’ जगण्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या हृदयात कोरले गेले. शिस्त, चारित्र्यसंपन्नता, निष्कलंकता व साधेपणा या घटकांनी त्यांचे जगणे समृद्ध केले. प्रकृती साथ देईपर्यंत न्यू मोतीबाग तालमीत ते रोज सकाळी सहाला हजेरी लावत राहिले. मल्लांना ‘कॉन्फिडन्स’ देण्यात ते कधीच कमी पडले नाहीत. लाल मातीशी त्यांचे ऋणानुबंध कायम राहिले. 

आंदळकर वस्ताद यांनी लाल माती गाजवली. सांगली जिल्ह्यातील पुनवत या छोट्या गावातून येऊन ते कोल्हापूरच्या मातीशी एकरूप झाले. वस्ताद बाबासाहेब वीर यांच्या कडक शिस्तीत घामाच्या धारा लागेपर्यंत त्यांचा सराव सुरू झाला. ते पिळदार शरीरयष्टीमुळे सहकारी मल्लांना भारी पडत होते. जिंकलो की हरलो, यापेक्षा लढलो या तत्त्वाला त्यांनी सळसळत्या वयातच आपलेसे केले. पाकिस्तानचा मल्ल नासीर पंजाबी याला धूळ चारल्यानंतर त्यांच्या यशाची कमान चढती राहिली. पंजाबचा मल्ल खडकसिंग याला १९६० मध्ये पराभूत करीत त्यांनी हिंदकेसरीची गदा पटकावली. पुढे १९६२ मध्ये जाकार्तामध्ये झालेल्या एशियाड ग्रीको रोमन गटात सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक पटकावून देशाचा तिरंगा फडकावला. त्यांनी १९६४ मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्येही देशाचे नेतृत्व केले. त्यांच्या नावाचा डंका देशभर वाजू लागला. त्यांनी कारकीर्दीत पाकिस्तानातील ४० हून अधिक मल्लांना अस्मान दाखविले. 

कुस्तीतील डावपेचांचे उत्तम जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. मैदानावरील लढती बंद झाल्यानंतर त्यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम हाती घेतले. मोतीबाग तालमीतील मल्लांना त्यांच्या कडक शिस्तीचा अनुभव घ्यायला मिळाला. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, ॲग्नेल निग्रो, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार हे त्यांच्या तालमीत तावून सुलाखून तयार झालेले मल्ल. यांच्या कुस्तीतील पदकांवर नजर टाकली, तर यांचा ‘वस्ताद’ खमक्‍याच असणार, हे सहज लक्षात येते. आंदळकर शहरातील रस्त्यावरून जरी चालत गेले, की लोक आदराने त्यांच्याकडे पाहत होते. उदयोन्मुख मल्ल त्यांना पुढे येऊन नमस्कार करायचे. वस्तादांनी मल्लांवर जीवापाड प्रेम केले. 

वस्तादांचा वाढदिवस म्हणजे तालमीत आनंदाचा सोहळाच असायचा. काही वर्षांपूर्वी ‘ब्रेन हॅमरेज’मुळे वस्तादांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तालमीतील मल्ल अस्वस्थ झाले. वस्ताद पूर्ण बरे झाल्यानंतर वस्तादांची काळजी घेत ते त्यांच्याकडून डावपेचांचे शिक्षण घेत राहिले. वस्तादांचे मल्लविद्येवर निस्सीम प्रेम होते. प्रकृती अस्वस्थ असताना ते एक महिना तालमीत राहायला होते. त्या वेळी मल्लांनी त्यांची सेवा केली. काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्याला हलविण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची सातत्याने चौकशी मल्ल करीत होते. आज वस्ताद आपल्यात नाहीत, ही भावना त्यांना पोखरणारी ठरत असली, तरी भविष्यात ऑलिंपिकचे पदक मिळविणे, हीच वस्तादांना श्रद्धांजली ठरेल, असा पॉझिटिव्हनेस ते बाळगतील, हे नक्की.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com