नौशाद शेखचे नाबाद शतक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

हैदराबाद - मधल्या फळीत नौशाद शेखने झळकावलेले नाबाद शतक आणि अंकित बावणेबरोबर तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या 177 धावांच्या भागीदारीमुळे महाराष्ट्राने रणजी लढतीत राजस्थानविरुद्ध दमदार सुरवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नौशाद शेख 118, तर राहुल त्रिपाठी 19 धावांवर खेळत होता.

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी घेतली. मात्र, त्यांच्या डावाची सुरवात निराशाजनक झाली. मूर्तझा ट्रंकवाला (6) झटपट बाद झाला. त्यानंतर कर्णदार स्वप्नील गुगळेदेखील बाद झाला. चाळीस धावांत महाराष्ट्राचे दोन गडी बाद केल्यावर राजस्थान त्यांच्यावर दडपण वाढवण्यात अपयशी ठरले. नौशाद आणि अंकित बावणे यांनी टिच्चून फलंदाजी करून राजस्थानच्या गोलंदाजांना निराश केले.

नौशाद आणि अंकित यांनी खेळपट्टीवर उभे राहण्याचे धोरण अवलंबले आणि स्थिरावल्यानंतर गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरवात केली. खराब चेंडूंची वाट बघत त्यांनी फारसा धोका पत्करला नाही. कर्णधार पंकज सिंग याने ही जोडी फोडण्यासाठी अथक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी तब्बल आठ गोलंदाजांचा वापर केला. पण, त्याला यश आले नाही. नौशादने रणजी स्पर्धेतील पहिले शतक साजरे कले, तर बावणे मोसमातील दुसऱ्या शतकाच्या मार्गावर असताना बाद झाला. त्याने 174 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 83 धावा केल्या. बावणे बाद झाल्यानंतरही नौशादने राहुल त्रिपाठीला साथीला घेत महाराष्ट्राचे आणखी नुकसान टाळले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 63 धावांची नाबाद भागीदारी केली. नौशाद 256 चेंडूत 18 चौकार आणि एका षटकारासह 118 धावांवर खेळत आहे. त्रिपाठीने 19 धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक ः महाराष्ट्र पहिला डाव 88 षटकांत 3 बाद 280 (नौशाद शेख खेळत आहे 118, अंकित बावणे 83, राहुल त्रिपाठी खेळत आहे 19, पंकज सिंग 2-38)