फेसबुकवरही "विराट'चे विराटप्रेमी

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार "विराट कोहली' आता सोशल मीडियावरही अतिशय लोकप्रिय होत आहे. सध्या माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे - विराट कोहली यांच्यातील मतभेदांमुळे विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र या वादाचा परिणाम म्हणजे सोशल मीडियावरील लोकप्रियतेवर झाला आहे. जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या भारतीयांमध्ये नरेंद्र मोदीनंतर दुसरे नाव म्हणजे क्रिकेटपटू विराट कोहलीचे आहे. यावरूनच जगभरात असलेल्या "विराटच्या विराटप्रेमीं'ची प्रचिती येते.

सोशल मीडियावरील विराटच्या या वाढत्या लोकप्रियतेला कोणत्याही सीमेचेही बंधन राहिले नसून पाकिस्तानमध्येही ती वाढताना दिसते. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फेसबुकवर 3.05 कोटी (35 मिलियन) फॉलोअर्स आहेत. नरेंद्र मोदींचे 4.22 कोटी (42.2 मिलियन) आहेत.

फेसबुकवरील चाहत्यांचा विचार केल्यास त्याच्या पाकिस्तानमधील चाहत्यांची संख्या तब्बल 11 लाखांच्या वर आहे. फेसबुकवर फॉलो केल्या जाणाऱ्या तीन प्रमुख व्यक्तींपैकी पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आता विराजमान झाला असून तिसऱ्या क्रमांकावर सुपरस्टार दबंग सलमान खान अशी क्रमवारी होत आहे. सलमान खान पेक्षा विराटचे 600000 फॉलोअर्स जास्त आहेत.

फेसबुकच्या एकंदरीत आकडेवारीवरून मैदानात पाकिस्तानच्या गोलंदाजांची दाणादाण उडविणाऱ्या विराटचा खेळ तरीही लाखो पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना आवडतो हेच त्याच्या फॅन फॉलोअर्सच्या संख्येवरून दिसते.