जिम्नॅस्ट दीपा कर्माकर जागतिक स्पर्धेसही मुकणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

धोका पत्करणार नसल्याची मार्गदर्शक नंदी यांची ग्वाही

धोका पत्करणार नसल्याची मार्गदर्शक नंदी यांची ग्वाही
मुंबई - गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर जागतिक जिम्नॅस्टिक स्पर्धेसही मुकण्याची दाट शक्‍यता आहे. आम्ही पुनरागमनाची कोणतीही घाई करणार नाही. प्रसंगी जागतिक स्पर्धेसही दीपास मुकावे लागेल, असे तिचे मार्गदर्शक बिश्‍वेश्‍वर नंदी यांनी "सकाळ'ला सांगितले.

दीपाला सराव करीत असताना रविवारी गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर लगेच तिला मुंबईत नेण्यात आले होते. डॉ. अनंत जोशी यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. आपली पुनर्वसन प्रक्रियाही सुरू झाल्याचे ट्‌विट दीपाने केले होते. या दुखापतीमुळे पुढील महिन्यातील आशियाई स्पर्धेपासून दीपाला मुकावेच लागणार हे स्पष्ट आहे.

दीपाला किमान तीन महिने जिम्नॅस्टिकच्या सरावापासून दूर राहावे लागणार आहे. जिम्नॅस्टिकमधील व्हॉल्ट प्रकारात गुडघ्यावरच जास्त जोर पडतो. तो पूर्णपणे ठीक झाल्याशिवाय आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. सराव सुरू झाल्यावरही थेट पूर्ण जोशात सुरू होणार नाही. भविष्याचा विचार करून कोणतीही घाई करून चालणार नाही. तिच्या प्रगतीचा फिझिओ तसेच डॉक्‍टर सातत्याने आढावा घेणार आहेत. त्यानंतरच सराव कधीपासून ते ठरवणार आहोत; मात्र किमान तीन महिने तरी नाही, असा सध्याचा आमचा कयास आहे, असे बिश्वेश्वर नंदी यांनी सांगितले.

जागतिक स्पर्धा ऑक्‍टोबर महिन्यात आहे. ही स्पर्धा मॉंट्रियल (कॅनडा) येथील ऑलिंपिक स्टेडियमवर होईल. दीपाचा प्राथमिक सराव सध्याच्या अंदाजानुसार जुलैपासूनच फार तर सुरू होऊ शकेल. सुरवातीचा सराव फारसा ताण देणारा नसेल, या परिस्थितीत दीपाला जागतिक स्पर्धेपासून दूर ठेवण्याचा विचार होत आहे.

Web Title: gymnast deepa Karmakar miss the world competition