हरियाना खेळाडूंना हवा बक्षिसाचा दुहेरी मलिदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

चंडीगड - बक्षीस रकमेत कपात होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या प्रमुख खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हरियाना सरकारला पदक विजेत्यांसाठी आयोजित केलेला सत्कार सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

चंडीगड - बक्षीस रकमेत कपात होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या प्रमुख खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळे हरियाना सरकारला पदक विजेत्यांसाठी आयोजित केलेला सत्कार सोहळाच रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६६ पदके मिळवली. त्यातील २२ पदके हरियानातील खेळाडूंची होती. कोणत्याही प्रतिथयश स्पर्धेत पदक मिळवल्यावर हरियाना सरकार पदक विजेत्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्यात आघाडीवर असते. त्यानुसार या वेळीही त्यांनी आघाडी घेतली होती. या पदक विजेत्यांचा जंगी सत्कार करण्याची तयारीही त्यांनी केली होती. परंतु महिला कुस्तीगीर विनेश पोघट, भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॉक्‍सर मनोज कुमार यांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा इरादा नवोदित खेळाडूंनी व्यक्त केला होता. 

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आम्ही सत्कार सोहळा रद्द करत आहोत आणि सध्याच्या क्रीडा धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहोत, असे हरियाना सरकारचे क्रीडामंत्री अनिल विज यांनी सांगितले. जे खेळाडू रेल्वे किंवा सेनादलाचे प्रतिनिधित्व करतात; परंतु मूळचे हरियानाचे असल्यामुळे आम्ही त्यांचा अपवाद करत नाही. रक्कम कमी करण्याचा अधिकार आमच्याकडे आहे, असेही विज यांनी स्पष्ट केले. अर्थात यानंतरही अंतिम निर्णय बाकी असल्यामुळे पुरस्कार सोहळा लांबणार हे नक्की.

बहिष्काराचे नेमके कारण 
हरियाना सरकारने आखलेल्या रचनेनुसार राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्याला १.५० कोटी, रौप्य ७५ लाख आणि ब्राँझपदक विजेत्याला ५० लाख देण्यात येणार होते; परंतु नावाजलेले खेळाडू सेनादल, रेल्वे आदी ठिकाणी नोकरी करतात. तेथूनही त्यांना बक्षीस रक्कम मिळणार आहे. ही बक्षीस रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यात येईल, असे हरियाना सरकारने जाहीर केले. त्यामुळे तिळपापड झालेल्या या खेळाडूंनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

जे खेळाडू राज्याकडून खेळतात त्यांनाच रोख रकमेची बक्षिसे देण्याचे धोरण स्पष्ट आहे. जे खेळाडू रेल्वे किंवा सेनादलाचे प्रतिनिधित्व करतात त्यांना बक्षिसे देण्याची तरतूद नाही.
- अनिल विज, हरियानाचे क्रीडामंत्री

Web Title: Haryana players get double reward