बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे हिनाची माघार

वृत्तसंस्था
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

खेळाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या संस्कृतींचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या धर्मांचे खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत आणि त्या वेळी केवळ खेळ हेच त्यांचे ध्येय असते

मुंबई - महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारताची नेमबाज हिना सिद्धूने इराणमध्ये होणाऱ्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे.

मला काही क्रांती करायची नाही, पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे, तसेच अशा अडथळ्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे माझे वैयक्तित मत आहे आणि त्यामुळेच मी या स्पर्धेतून माघार घेत आहे, असे हिनाने स्पष्ट केले. आपल्या माघारीचा निर्णय तिने भारतीय नेमबाजी संघटनेला कळवला आहे.

खेळाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या संस्कृतींचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या धर्मांचे खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत आणि त्या वेळी केवळ खेळ हेच त्यांचे ध्येय असते, असेही हिनाने म्हटले आहे.

इराणमधील या स्पर्धेत हिनाकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. 2013 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ती रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती.