आयएसएल इतिहास घडविण्याची केरळा, कोलकताला संधी 

आयएसएल इतिहास घडविण्याची केरळा, कोलकताला संधी 

कोची - हीरो इंडियन सुपर लीगच्या अंतिम सामन्यात केरळा ब्लास्टर्स आणि ऍटलेटिको डी कोलकता हे संघ रविवारी आमने-सामने येतील. प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि घरच्या मैदानावरील पाच सामन्यांची विजयी मालिका या केरळासाठी जमेच्या बाजू असतील. त्यामुळे एटीकेला हरविण्याचा आणि पहिल्या आयएसएल अंतिम सामन्यातील पराभवाच्या भरपाईचा विश्‍वास त्यांना वाटत असेल. 

दोन वर्षांपूर्वी आयएसएलला प्रारंभ झाला तेव्हा केरळाला मुंबईतील अंतिम सामन्यात एटीकेने एकमेव गोलने हरविले होते. अंतिम टप्प्यात हा गोल झाला होता. हा पराभव केरळासाठी धक्कादायक ठरला होता. त्यामुळे आता भरपाई करण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

केरळाचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, ते दोन वर्षांपूर्वी घडले होते. तेव्हाचे दोनच खेळाडू या सामन्याचा भाग आहेत. वास्तविक त्या सामन्यात निर्णायक गोल केलेला एक खेळाडू आमच्याकडे आहे. 

हा खेळाडू म्हणजे महंमद रफीक होय. त्या संस्मरणीय सामन्यात तो बदली खेळाडू म्हणून उतरला आणि भरपाई वेळेतील चौथ्या मिनिटाला त्याने हेडिंगवर गोल नोंदवून एटीकेचे ऐतिहासिक विजेतेपद साकार केले. त्यानंतर खूप काही बदलले आहे. रफीक आता केरळाकडे आहे. बुधवारी दिल्ली डायनॅमोजविरुद्ध उपांत्य फेरीत त्याने पेनल्टीवर गोल केला. 

कॉप्पेल यांनी सांगितले की, खूप काही बदलले आहे. ही स्पर्धा पूर्णपणे वेगळी आहे. सूडाच्या भावनेने आम्ही खेळणार नाही. त्याऐवजी संघभावना आणि विजेतेपदाचा निर्धार हे आम्हाला चालना देणारे घटक असतील. 

केरळाने घरच्या मैदानावर पाच सामन्यांत विजयी मालिका राखली आहे. त्यांच्या स्टेडियमवर प्रेक्षक खचाखच गर्दी करतात. आता अंतिम सामन्याला विक्रमी उपस्थितीची अपेक्षा आहे, पण त्यामुळे विजेतेपदाची हमी मिळत नाही, असे कॉप्पेल यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले की, आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत. स्टीफन पिअर्सन आणि इयन ह्यूम अशा काही खेळाडूंना या वातावरणाचा अनुभव आहे. आमचे सर्व समर्थक असणे फायद्याचे ठरेल. त्यांचा पाठिंबा पूर्ण 90 मिनिटे मिळेल हे नक्की असेल. बाकी कशाची खात्री देता येणार नाही. प्रोत्साहनाचा आमच्यावर काय परिणाम झाला हे सामन्यानंतरच कळेल. आम्ही कोणत्याही प्रकारे विजयाचे दावेदार नाही. 

एटीकेनेसुद्धा तेवढाच निर्धार केला असेल. तीन वर्षांत दोन वेळा विजेतेपद मिळविणारा पहिलाच संघ बनण्याची त्यांना संधी आहे. सलग तीन वर्षे बाद फेरी गाठलेला एटीके हा एकमेव संघ आहे. आणखी एक विजेतेपद मिळविल्यास त्यांच्या शिरपेचात तुरा खोवला जाईल. 

या लढतीकडे सचिन तेंडुलकर विरुद्ध सौरभ गांगुली अशा दृष्टीने पाहिले जात आहे. सचिन हा केरळाचा, तर गांगुली हा एटीकेचा संयुक्त मालक आहे. या दोघांनी जागतिक क्रिकेटमध्ये भक्कम जोडी म्हणून लौकिक कमावला. क्रिकेटमुळे एकत्र आलेले हे दोन दिग्गज आता आयएसएल अंतिम सामन्याच्या वेळी प्रतिस्पर्धी बनतील. आपल्या संघाला यशासाठी प्रेरित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. 

2014 मध्ये गांगुलीची सरशी झाली होती, आता दोन वर्षांनी सचिनची होणार का, याची उत्सुकता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com