आता ब्राँझ नको, सुवर्णपदकच पाहिजे : विकास

वृत्तसंस्था
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

दोन दिवस मी 'रिलॅक्‍स' राहणार आहे. सामन्याच्या दिवशी मी त्या लढतीचा विचार करेन. मला सध्या फक्त तणावमुक्त राहायचे आहे. माझे मित्र इथे आले आहेत; माझे प्रशिक्षकही आहेत. आता मी तणावमुक्त राहिलो, तर पूर्ण ताकदीने आणि नव्या जोमाने त्या सामन्यामध्ये उतरू शकेन.
- विकास कृष्णन, भारताचा मुष्टियोद्धा

रिओ डि जानिरो : ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापासून भारताचा मुष्टियोद्धा विकास कृष्णन आता फक्त एकच विजय दूर आहे. पण त्याला खुणावत आहे थेट सुवर्ण पदकच.. उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या विकासने आणखी एक विजय मिळविला, की त्याचे किमान ब्रॉंझ पदक तरी नक्की आहे. पण 'मला रौप्य किंवा ब्रॉंझ नको.. फक्त सुवर्ण पदकच जिंकायचे आहे' अशी भावना त्याने व्यक्त केली. त्याची ही लढत 15 ऑगस्ट रोजी होणार आहे.

तुर्कस्तानच्या ओंडर सिपलवर 3-0 अशी मात करत विकास उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. त्याच्यासमोर आता उझबेकिस्तानच्या बेक्तेमिर मेलिकुझिव याचे आव्हान असेल. विकास 24 वर्षांचा, तर मेलिकुझिव 20 वर्षांचा आहे. मेलिकुझिवने 2014 मध्ये युवा ऑलिंपिक आणि युवा जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत अजिंक्‍यपद पटकाविले होते, तर 2015 मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्य पटकाविले होते. गेल्या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत मेलिकुझिवने विकासवर मात केली होती.

उप-उपांत्यपूर्व फेरी जिंकल्यानंतर विकास म्हणाला, "मेलिकुझिव हा या गटातील सर्वांत खडतर प्रतिस्पर्धी आहे. त्याच्यावर मात करू शकलो, तर मी सुवर्ण पदक जिंकूनच मायदेशी परत येईन; रौप्य किंवा ब्रॉंझ नाही! एकतर मी रिकाम्या हाती परतेन किंवा थेट सुवर्णच जिंकेन.. मेलिकुझिववर विजय मिळविला, तर सुवर्ण नक्की मिळेल. तो जास्त ताकदवान आहे. पण त्याला उंचीचा फायदा मिळू शकत नाही. त्याच्याकडे ताकद आणि चांगली क्षमता (स्टॅमिना) आहे, शिवाय तो तरुणही आहे.''