मेस्सीलाच फॉलो करणार, पण फेव्हरेट कुणीच नाही - छेत्री

यूएनआय
मंगळवार, 12 जून 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता तोंडावर असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही चांगलाच बहरात आला आहे. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी करण्याची कामगिरी त्याने केली असून, आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण मेस्सीलाचा "फॉलो' करणार असलो, तरी विजेता म्हणून आपला कुठलाच संघ फेव्हरेट नसल्याचे त्याने सांगितले

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता तोंडावर असतानाच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीही चांगलाच बहरात आला आहे. मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी करण्याची कामगिरी त्याने केली असून, आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेत आपण मेस्सीलाचा "फॉलो' करणार असलो, तरी विजेता म्हणून आपला कुठलाच संघ फेव्हरेट नसल्याचे त्याने सांगितले. 

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्याने आपली मते मांडली. तो म्हणाला, ""आता महिनाभर विश्‍वकरंडक फुटबॉल सामन्याचा आनंद आपण घेणार आहोत. स्पर्धेबाबत मी कमालीचा उत्सुक आहे. कुठलाच संघ आपला फेव्हरेट नाही. सर्व सामने बघणार आहोत. खेळाडू म्हणून म्हणाल, तर अर्थातच मी मेस्सीला "फॉलो' करणार आहे.'' 

चार देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्यपूर्ण गोल करून छेत्रीने मेस्सीच्या 64 आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी केली आहे. छेत्री म्हणाला, ""माझ्यासाठी ही मोठी उपलब्धी असली, तरी मला अजून मोठी मजल मारायची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक खेळायचे आहे.'' 

भारतामध्ये फुटबॉल गुणवत्ता भरपूर आहे. पण, ती समोर यायला हवी. सध्याचा संघही चांगला आहे. या संघाला किमान आशियातील सर्वोत्तम संघांबरोबर खेळण्याची अधिक संधी मिळाली, तर भारतीय फुटबॉलसाठी ते फायद्याचे असेल, असेही छेत्रीने सांगितले. 

भारताच्या प्रगतीविषयी 
-विश्‍वकरंडक खेळण्यासाठी प्रथम आशियाई स्तरावर प्रगती व्हायला हवी 
-आशियाई क्रमवारीत पहिल्या दहांत येण्याचे आमचे लक्ष्य 
-आशियातील इराण, ऑस्ट्रेलिया, जपान, कोरिया आणि सौदी अरेबिया हे सध्याचे अव्वल संघ 
-जागतिक क्रमवारीतही हे संघ भारतापुढे. भारताचे जागतिक मानांकन 97, तर आशियात 14वे 
-फुटबॉल प्रगतीसाठी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज 
-त्यामुळे प्रेक्षकही सामने पाहायला येतील आणि लपलेली गुणवत्ताही समोर येईल 

Web Title: i will follow Messi, but nobody is favored says sunil Chhetri