गॅटलीनमुळे अमेरिकेचे अपेक्षित वर्चस्व

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. अंतिम फेरी गाठून आम्ही लक्ष्य नजीक आणले. आम्ही ट्रॅकवर उतरलो आणि आम्हाला जे अपेक्षित होते ते साध्य केले. आम्ही बॅटन व्यवस्थित पास केले. 
- एलानी थॉमसन, जमैकाची धावपटू 

नासाऊ (बहामा) - जस्टीन गॅटलीनच्या वेगवान कामगिरीच्या जोरावर अमेरिकेने जागतिक रिले स्पर्धेत 4 बाय 100 मीटर रिले शर्यत जिंकली. विश्‍वविक्रमी उसेन बोल्टच्या अनुपस्थितीत गॅटलीनमुळे अमेरिकेने अपेक्षित वर्चस्व राखले. जमैकाच्या प्राथमिक शर्यतीमध्येच बॅटन पडल्याचा फटका बसला. 

प्राथमिक फेरीत कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासी याने गॅटलीनला झुंज दिली होती, पण अंतिम फेरीत बॅटन पडल्यामुळे कॅनडाचा शर्यतच पूर्ण करता आली नाही. अमेरिकेने 38.43 सेकंद वेळेत विजय मिळविला. याबरोबरच अमेरिकेने जेतेपद राखले. कॅनडाकडून गफलत झाली. दुसऱ्या टप्यातील धावपटू ऍरन ब्राऊन याने सहकारी ब्रेंडन रॉडनी याला बॅटन देताना खांदा वर केला, पण तोच बॅटन त्याच्या हातून सुटले. तेथेच कॅनडाच्या आशा संपुष्टात आल्या. बार्बाडोसने (39.18) रौप्य, तर चीनने (39.22) ब्रॉंझ मिळविले. चीनची कामगिरी अनपेक्षित ठरली. 

गॅटलीन 35 वर्षांचा आहे. तो म्हणाला, "मी पूर्वी अंतिम टप्यात फारसा धावलो नव्हतो, पण माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण केली. शेवटी सरस वेगापेक्षा नियोजन सफाईदारपणे राबविणे महत्त्वाचे असते. ब्रिटन आणि कॅनडाच्या धावपटूंकडून बॅटन पडले. त्यामुळे 20 मीटर बाकी असताना माझ्या आसपास कुणी नव्हते. सगळे गेले कुठे, असे कोडे मला पडले होते.' 

दुसरीकडे जमैकाचा तिसऱ्या टप्यातील धावपटू जेवॉन मिन्झी याला किमर बेली-कोल याच्याकडून बॅटन नीट घेता आले नाही. त्यामुळे अंतिम टप्याच्यावेळी योहान ब्लेकसमोर अशक्‍यप्राय आव्हान होते. अखेरीस जमैकाला शर्यतच पूर्ण करता आली नाही. बोल्टप्रमाणेच असाफा पॉवेलची उणीव जमैकाला जाणवली. 

महिला रिलेत विश्‍वविक्रम 
जमैकाने महिलांच्या 4 बाय 200 मीटर रिले शर्यतीत जमैकाने एक मिनीट 29.04 सेकंद वेळेचा विश्‍वविक्रम नोंदविला. पहिल्या टप्यात जुरा लेव्ही हिची वेगवान कामगिरी निर्णायक ठरली. अंतिम टप्यात ऑलिंपिकमधील दुहेरी विजेत्या एलानी थॉमसनने विश्‍वविक्रमावर थाटातच शिक्कामोर्तब केले. दोन वर्षांपूर्वी याच चौघींकडून "बॅटन एक्‍स्चेंज'मध्ये चूक झाली होती. यावेळी मात्र त्यांनी सफाईदार कामगिरी करीत टप्यागणिक आघाडी वाढविली. एलानीला बॅटन मिळाले तेव्हा तब्बल एका सेकंदाची आघाडी होती. ती तिने दीड सेकंदांपेक्षा जास्त वाढविली. जर्मनीने (1:30.68) दुसरा क्रमांक मिळविताना अमेरिकेला (1:30.87) चकविले. 

आमच्यावर कोणतेही दडपण नव्हते. अंतिम फेरी गाठून आम्ही लक्ष्य नजीक आणले. आम्ही ट्रॅकवर उतरलो आणि आम्हाला जे अपेक्षित होते ते साध्य केले. आम्ही बॅटन व्यवस्थित पास केले. 
- एलानी थॉमसन, जमैकाची धावपटू