अपेक्षांचा विचार केल्यास दडपण वाढते - सिंधू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

बॅडमिंटन लीग लिलावात मला मिळालेली रक्कम पाहून धक्का बसला नाही किंवा दुःखीही झाले नाही. चेन्नई संघातच मी आहे याचा मला आनंद आहे. यंदाच्या स्पर्धेतील ऑलिंपिक पदकविजेते वाढले आहेत. त्यामुळे चुरस जास्तच असेल. माझ्या आणि कॅरोलिन मरीन यांच्यातील लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष असेल. ११ गुणांचा गेम, पाच गेमची लढतही चुरस वाढवणार हे नक्की.
- पी. व्ही. सिंधू

नवी दिल्ली - ऑलिंपिकमधील यशानंतर सर्वांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या अपेक्षांचा विचार केल्यास दडपण जास्तच वाढेल. मी सर्वोत्तम कामगिरी कशी करता येईल याचाच विचार करीत असते, असे ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने सांगितले.

ऑलिंपिकनंतर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अपेक्षा वाढल्या आहेत. जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाचे माझ्या कामगिरीकडे लक्ष आहे. अर्थातच मला जास्त कष्ट करावे लागतील. ऑलिंपिक पदक ही केवळ सुरुवात आहे असाच विचार मी केला आहे. मला अजून सुपर सीरिज, ऑल इंग्लंड, जागतिक यासारख्या अनेक स्पर्धा जिंकायच्या आहेत असे सिंधूने सांगितले.

ऑलिंपिक रौप्यपदक विजेती म्हणाली, ऑलिंपिकने मला खूप काही शिकवले. त्या स्पर्धेत मी अनेक सरस मानांकित खेळाडूंविरुद्ध खेळले. त्यांना माझ्याविरुद्धचा पराभव खूपच सलत असेल. आपल्यापेक्षा खालचे मानांकन असलेल्या खेळाडूकडून हरल्यावर जास्तच दुःख होते. चाहतेही जास्त निराश होतात. त्या वेळी जास्त सराव हाच पर्याय असतो. मीसुद्धा तोच विचार केला आहे.

जास्त यश मिळवण्याचे दडपण नाही. मी अजूनही खेळाचा तेवढाचा आनंद घेत आहे. ऑलिंपिक यशामुळे आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. रिओनंतरच्या दोन स्पर्धांत यश मिळाले नसले, तरी काही गुणांच्या फरकानेच हरले आहे. कोणत्याही स्पर्धेत कोणालाही कमी लेखायचे नसते याची मला पूर्ण जाणीव आहे, असे सिंधूने सांगितले.