पिछाडीवरून भारताचा विजय (वर्ल्ड हॉकी लीग)

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

स्कॉटलंडविरुद्ध 11 मिनिटांत 4 गोल

स्कॉटलंडविरुद्ध 11 मिनिटांत 4 गोल

लंडन : स्कॉटलंडने सुरुवातीच्या मिनिटास गोल केल्यावर खडबडून जागे झालेल्या भारतीय हॉकी संघास बरोबरीच्या गोलसाठी अर्धा तास प्रतिक्षा करावी लागली खरी, पण त्यानंतर भारतीयांनी दोन संघातील वाढती तफावत सहज दाखवत जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या स्पर्धेत विजयी सलामी देताना 4-1 असा सहज विजय मिळविला. 

पूर्वार्धात स्कॉटलंडने सुरेख खेळ केला, पण त्यास भारताच्या सदोष खेळाची एक प्रकारे साथ लाभली. प्रामुख्याने वैयक्तिक कौशल्यावर भर देण्याची चूक भारतीयांकडून घडत होती. त्यातच आक्रमक आणि मधल्या फळीत समन्वयाचा अभाव होता. पूर्वार्धात भारतास एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नव्हता, त्यावरुन खेळाची कल्पना येईल. त्यावेळी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कितीतरी जास्त सरस असलेला भारतीय संघ विजयासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे का ही शंका येत होती. 

उत्तरार्धात मात्र चित्र बदलले. मार्गदर्शक रोएलॅंत ऑल्तमन्स यांनी केलेल्या कानऊघाडणीचा फायदा दिसला. रमणदीपने तीन मिनिटात दोन गोल करीत भारताचा प्रतिकार सुरु केला. पहिल्या सत्रात सुरुवातीच्या मिनिटात गोल झाल्यामुळे स्कॉटलंडने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाच फायदा घेत रमणदीपने गोल केला. भारताचा धडाका पाहून स्कॉटलंड बचावावर भर दिला, पण तोही भेदला गेल्यावर त्यांचा आत्मविश्वास खच्ची झाला. भारतीयांनी प्रतिस्पर्धी स्थिरावण्यापूर्वीच आघाडी घेतली होती. आकाशदीप आणि हरमनप्रीतने हाच गोलधडाका कायम ठेवला. भारतीयांनी तिसऱ्या सत्रात अकरा मिनिटात चार गोल करीत लढतीचा निर्णयच केला होता. 

पहिल्या सत्रानंतर भारतीय आक्रमक नेहमीप्रमाणे गोलक्षेत्रात नांगी टाकणार असेच वाटत होते, त्यातच भारतीय संघात सतत बदल केले जात होते. दुसऱ्या सत्रात भारतीय आक्रमकांची डोकेदुखी झालेला स्कॉटलंड गोलरक्षक टॉमी अलेक्‍झांडर तिसऱ्या सत्रात दडपणाखाली कोलमडला. रमणदीपच्या रिव्हर्स हीटने चित्र बदलले. एस व्ही सुनीलची अप्रतिम चाल भारतीयांच्या विरोधकांनाही प्रभावीत करणारी होती. 

- जागतिक क्रमवारीत भारत सहावा, तर स्कॉटलंड 23 वे 
- भारताचा स्कॉटलंडविरुद्धचा सलग सहावा विजय 
- भारताने स्कॉटलंडविरुद्धची सर्व लढती जिंकण्याची मालिका कायम राखली 
- भारताची पुढील लढत शनिवारी कॅनडाविरुद्ध (संध्याकाळी 6.30) 

विश्रांतीच्यावेळी आम्ही चर्चा केली. त्यावेळी सर्वांनी गोलक्षेत्रातील चूका दूर करण्यासाठी एकमेकांना काय करायला हवे ते सांगितले. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी ऊंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे. या लढतीतील चूकांची पुनरात्‌ृती नक्कीच टाळण्याकडे लक्ष देणार आहोत 
- मनप्रीत सिंग, भारतीय कर्णधार 

आम्ही चांगल्या संघाने हरवले. प्रतिस्पर्धी संघ स्थिरावण्यापूर्वी आक्रमणे कसे करावे हेच त्यांनी दाखवले. उत्तरार्धात कशी सुरुवात करावी हे त्यांच्याकडून नक्कीच आत्मसात करणार आहोत. 
- अँडरसन रसेल, स्कॉटलंड