भुवनेश्‍वरचे पाच बळी; लंकेचा डाव 238 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

डावाच्या 39 व्या षटकांत थिरिमने याचा भुवनेश्‍वरने त्रिफळा उडविल्यानंतर श्रीलंकेच्या डावास निर्णायक खिंडार पडले. यानंतर नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने एकवेळ सुस्थितीत असलेला श्रीलंकेचा डाव कोसळला. थिरिमने परतल्यानंतर मॅथ्यूज हाही त्वरितच बाद झाला

कोलंबो - भुवनेश्‍वर कुमार (42 धावा - 5 बळी) व जसप्रित बुमराह (45 धावा - 2 बळी) या वेगवान गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने आज (रविवार) श्रीलंकेस 238 धावांत रोखण्यात यश मिळविले.

श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाज लाहिरु थिरिमने (67 धावा - 102 चेंडू) आणि अँजेलो मॅथ्यूज (55 धावा - 98 चेंडू) यांच्यात झालेल्या शतकी भागीदारी श्रीलंकेच्या फलंदाजीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. डावाच्या 39 व्या षटकांत थिरिमने याचा भुवनेश्‍वरने त्रिफळा उडविल्यानंतर श्रीलंकेच्या डावास निर्णायक खिंडार पडले. यानंतर नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने एकवेळ सुस्थितीत असलेला श्रीलंकेचा डाव कोसळला. थिरिमने परतल्यानंतर मॅथ्यूज हाही त्वरितच बाद झाला.

या सामन्यात प्रभावी गोलंदाज केलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव (40 धावा - 1बळी) याने मॅथ्यूज याचा मोठा अडसर दूर केला. यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीस सावरण्यास वेळ मिळाला नाही.

भुवनेश्‍वर यानेच लसिथ मलिंगा (2 धावा - 4 चेंडू) याला अखेरच्या षटकांत माघारी परतवित श्रीलंकेचा डाव 238 डावांत संपुष्टात आणला.