ऑस्ट्रेलियाच्या चिवट फलंदाजीने हिरावला भारताचा विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

रांची : पीटर हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांच्या चिवट व झुंजार खेळामुळे भारताविरुद्धची तिसरी क्रिकेट कसोटी आज (सोमवार) अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या दोघांनी जवळपास दीड सत्र खेळून काढत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.

रांची : पीटर हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांच्या चिवट व झुंजार खेळामुळे भारताविरुद्धची तिसरी क्रिकेट कसोटी आज (सोमवार) अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. या दोघांनी जवळपास दीड सत्र खेळून काढत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.

चेतेश्‍वर पुजाराच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 152 धावांची आघाडी घेतली होती. या आघाडीचे दडपण आणि फिरकीला अचानक मिळणारी साथ यासमोर हे आव्हान डोंगराएवढे होते. त्यातच, कालच्या आठ षटकांच्या खेळातच ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावले होते. त्यामुळे आज सकाळच्या सत्रात दडपण ऑस्ट्रेलियावरच होते. पण मॅट रेनशॉ आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी प्रचंड चिवट खेळ केला. सकाळच्या पहिल्या सत्रात या दोघांनी भारतीय गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही. त्यातच, भारतीय कर्णधार विराट कोहलीची सुरवातीची व्यूहरचनाही कोड्यात टाकणारी होती. उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा या तीनच गोलंदाजांना त्याने सकाळच्या सत्रात प्रामुख्याने संधी दिली. या तिघांनाही विकेटच्या संधी निर्माण करता येत नव्हत्या.

अखेर ईशांत शर्माने चेंडू अप्रतिम स्विंग करत रेनशॉला बाद केले. याच्या पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाचा एक चेंडू सोडण्याचा स्मिथचा अंदाज चुकला आणि त्याचा त्रिफळा उध्वस्त झाला. या यशामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य कमालीचे उंचावले होते. त्यानंतर हॅंडकोम्ब आणि मार्श मैदानावर एकत्र आले, तेव्हा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात 72 धावांनी पिछाडीवर होती. या दोघांनी खेळपट्टीवर नांगर टाकत भारतीय गोलंदाजांना अजिबात संधी दिली नाही. दुसरे सत्र या दोघांनी खेळून काढले. त्यामुळे चहापानाला खेळ थांबला, तेव्हा ऑस्ट्रेलियाला सामना अनिर्णित राखण्याच्या आशा निर्माण झाल्या होत्या.

शॉन मार्श आणि हॅंड्‌सकोम्ब यांनी संथ आणि संयमी खेळाचा वस्तुपाठच सादर केला. मार्शने 197 चेंडूंमध्ये 53 धावा केल्या, तर हॅंड्‌सकोम्बने 200 चेंडूंचा सामना करत नाबाद 72 धावा केल्या. दिवसाच्या खेळातील अखेरची दहा षटके शिल्लक असताना भारताने दोन गडी बाद केले; मात्र तोपर्यंत सामन्याचा निकाल लागण्यासाठी उशीर झाला होता. हॅंड्‌सकोम्ब आणि मॅथ्यू वेड यांनी पुढील पाच षटके खेळून काढत सामना अनिर्णित राखला.

भारताकडून जडेजाने चार, तर आश्‍विन आणि ईशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्याच्या निकालानंतर चार सामन्यांच्या मालिकेत अजूनही 1-1 अशी बरोबरी आहे.

संक्षिप्त धावफलक :
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 451
भारत : पहिला डाव : 9 बाद 603 घोषित
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : 6 बाद 204

Web Title: india v australia 3rd test match withdraw