भारताचा ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

पुण्यातील कसोटी तिसऱ्याच दिवशी संपल्यानंतर खेळपट्टीवर जोरदार टीका करण्यात आली होती. या कसोटीत मात्र खेळपट्टीने फिरकीबरोबरच जलदगती गोलंदाजांनाही मदत गेली. या कसोटीत खऱ्या अर्थाने बॅट आणि बॉलमध्ये खेळ पहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढले. 

बंगळूर - पुण्यातील पराभवाचा पुरेपूर बदला घेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आज (मंगळवार) ऑस्ट्रेलियावर दुसऱया कसोटीत 75 धावांनी विजय मिळवला आणि बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट घेणारा आर. अश्विन विजयाचा शिल्पकार ठरला. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात 188 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 112- धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला 28 धावांवर उमेश यादवने पायचीत बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडसर दूर केला. त्यानंतर अश्विनने विजयाची औपचारिकता पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.

पुण्यातील कसोटी तिसऱ्याच दिवशी संपल्यानंतर खेळपट्टीवर जोरदार टीका करण्यात आली होती. या कसोटीत मात्र खेळपट्टीने फिरकीबरोबरच जलदगती गोलंदाजांनाही मदत गेली. या कसोटीत खऱ्या अर्थाने बॅट आणि बॉलमध्ये खेळ पहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढले. 

अवघड खेळपट्टीवर 188 धावांचे आव्हान असताना ईशांतने सलामीवीर रेन्शॉला अवघ्या पाच धावांवर बाद केले. त्यानंतर वॉर्नर आणि स्मिथ यांनी धावसंख्या वाढविण्यास सुरवात केली. मात्र, अश्विनने वॉर्नरला पायचीत पकडले. वॉर्नरने या निर्णयाविरोधात रिव्ह्यू घेतला, पण तो बाद असल्याचे रिव्ह्यूमध्येही स्पष्ट दिसले. शॉन मार्श स्वस्तात 9 धावांवर उमेश यादवची शिकार ठरला. त्यानंतर स्मिथलाही उमेशने पायचीत बाद केले. या निर्णयावर रिव्ह्यू घेण्यासाठी स्मिथ आणि हँडस्कॉम्ब यांच्यात पॅव्हेलियनमध्ये पाहून चर्चा झाल्याचे पंचांच्या लक्षात आल्यानंतर पंचांनी स्मिथला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास सांगितले. यावेळी मैदानावरील वातावरण तापले होते. त्यानंतर हँडस्कॉम्ब आणि मिशेल मार्श यांनी आणखी पडझड रोखली. पण, अश्विनने मार्शला बाद करत ही जोडी फोडली. चहापानानंतर अश्विनने स्टार्कला त्रिफळाबाद केले. त्यापाठोपाठ जडेजानेही ओकीफला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 

त्यापूर्वी आज सकाळच्या सत्रात पहिल्या डावात फिरकी आणि दुसऱ्या डावात जलदगती गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. भारताचा दुसरा डाव स्टार्क आणि हेडझलवूड यांच्यासमोर भारतीय फलंदाजांनी घातलेल्या लोटांगणामुळे भारताचा डाव अवघ्या 274 धावांत आटोपला. पुजारा आणि रहाणे यांनी 4 बाद 213 वरून पुढे खेळताना फिरकीपटूंचा यशस्वी सामना केला. पहिल्याच षटकात लायनने पुजाराला पायचीत बाद केले. पण, पुजाराने रिव्ह्यू घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर या दोघांनी धावा जमवत संघाची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. अखेर 80 व्या षटकानंतर नवा चेंडू घेण्याचा कर्णधार स्मिथचा निर्णय सार्थकी लागला. स्टार्कने रहाणेला पायचीत बाद करत भारताच्या पडझडीला सुरवात केली. त्याने पुढच्याच चेंडूवर नायरला त्रिफळाबाद केले. त्याने हेझलवूडने कमाल दाखवत पुजारा, अश्विन, उमेश यादव यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. पुजाराने 92 धावांची खेळी केली. साहा आणि ईशांत यांनी काहीकाळ प्रतिकार करण्याचा प्रय़त्न केला. पण, ईशांतला बाद करत ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव संपुष्टात आणला. हेझलवूडने 6 बळी मिळविले होते.

धावफलक :
भारत पहिला डाव - 189
ऑस्ट्रेलिया पहिला डाव - 276
भारत दुसरा डाव - 274
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव - सर्वबाद 112 (स्टिव्ह स्मिथ 28, डेव्हिड वॉर्नर 17, आर. अश्विन 6/41, उमेश यादव 2/30, रवींद्र जडेजा 1/3, ईशांत शर्मा 1/28)