भारतीय क्रिकेटपटूंनी केले ‘गरुडमाची’ भ्रमण

भारतीय क्रिकेटपटूंनी केले ‘गरुडमाची’ भ्रमण

पुणे - ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी अडीच दिवसांत आटोपली. भारताचा विजय रथ ऑस्ट्रेलियाने रोखला. सलग यशाने हुरळून गेलेले भारतीय खेळाडू या पराभवाने जमिनीवर आले होते. दुसऱ्या कसोटीसाठी बंगळूरला रवाना होणारे विमान मंगळवारी (ता.२८) होते. निराशेचे ढग भारतीय संघावर पसरलेले होते. ते असेच राहिले तर त्याचा परिणाम पुढील सामन्यांवर होऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना ‘फ्रेश’ राहण्यासाठी सातत्याने वेगळा विचार करणाऱ्या प्रशिक्षक कुंबळेयांनी पुण्यातील मित्राच्या मदतीने ताम्हिणी घाटातील ‘गरुडमाची’ ट्रेकचे आयोजन केले. 

खेळाडूंच्या या ट्रेकचा कार्यक्रम आखताना योग्य ती खबरदारी घेण्यात आली. पुण्याचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि मिलिंद कीर्तने यांच्या सहकार्याने खेळाडूंसाठी अनोख्या ‘ट्रेझर हंट’चे आयोजन करण्यात आले. संपूर्ण भारतीय संघच या ट्रेकसाठी आला होता. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत विसावणारा सूर्य बघताना खेळाडू पराभवाच्या कटू आठवणीपासून काही वेळ दूर गेले. हातात कंपास टॉर्च आणि नकाशे घेऊन मिट्ट अंधारात दोन तास लपवलेल्या गोष्टी शोधून काढण्यात फार धमाल झाली. 

दुसऱ्या दिवशी सकाळीबरोबर ७ वाजता सुरेंद्र चव्हाण सोबत खेळाडूंनी ताम्हिणी घाटातील कॅमल बॅक पर्वतावर ट्रेकचा अनुभव घेतला. एक तासाच्या चढाई नंतर सगळे घाट माथ्याला पोचले, तेव्हा कोवळ्या सूर्यप्रकाशातील दऱ्याखोऱ्या बघून खेळाडू अधिकच शांत झाले. त्या प्रसन्न वातावरणात मग खेळाडू ‘सेल्फी’ घेण्यात दंग झाले. कुंबळे सरांचादी कॅमेरा ‘क्‍लिक’ झाला. साथीला चव्हाण यांचे हिमालयातील भटकंती आणि एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी ऐकत खेळाडूंना वेळ कसा गेला हे कळालेच नाही. सोबत आणलेला तिरंगा फडकावून त्याला मानवंदना देत खेळाडूंनी परतीचा मार्ग पकडला. 

सततच्या खेळामुळे थकलेले शरीर आणि पराभवाने सुन्न झालेले मन या ‘ट्रेक’मुळे शांत झाले होते. खेळापासून लांब जाऊन प्रशिक्षक कुंबळे यांच्या वेगळ्या विचाराने खेळाडू ताजेतवाने झाले. बऱ्याच दिवसांनी मोकळ्या आकाशाखाली फिरायला मिळाले आणि सह्यांद्रीचे सौदर्य अनुभवयाल मिळाल्याने आम्ही हरखून गेलो अशीच भावना खेळाडूंनी व्यक्त केली. पराभव विसरायला लावणारा हा अनुभव घेऊन भारतीय खेळाडू दुसऱ्या कसोटीसाठी मंगळवारी बंगळूरला रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com