इंग्लंडसह भारतीय नवोदितांची चलती

इंग्लंडसह भारतीय नवोदितांची चलती

बंगळूर - सर्व खेळाडूंचे करार संपुष्टात येण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या दहाव्या आयपीएलसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने भाव खाल्ला. विशेष म्हणजे भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची या लिलावात चलती राहिली. त्याचबरोबर भारतीयांबरोबरच परदेशातील बहुतांश अनुभवी क्रिकेटपटूंकडे फ्रॅचाईजींनी पाठ फिरवली.

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी आज सिटी हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली किंमत मिळाली. अनुभवी खेळाडूंना लिलावाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतरही खरेदीदाराच्या शोधात बसावे लागले. स्टोक्‍स आणि मिल्सला मिळालेली सर्वाधिक रक्कम, तसेच उदयोन्मुख खेळाडूंना मिळालेली साथ हेच आयपीएलचे वर्चस्व राहिले. संथ सुरवात झालेल्या लिलावास दुसऱ्या टप्प्यात वेग आला.

पुणे, बंगळूरची सर्वाधिक बोली
खेळाडूंच्या लिलावात या वेळी रायझिंग पुणे सुपर जाएंट्‌स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन फ्रॅंचाईजींनी सर्वाधिक बोली लावली. दोघांनी इंग्लंडच्या खेळाडूंना खरेदी केली. चर्चेत असलेल्या बेन स्टोक्‍सला पुणे संघाने सर्वाधिक १४ कोटी, तर मिल्सला बंगळूरने १२ कोटी रुपये मोजले. आयपीएलमधील स्टोक्‍सची बोली दुसऱ्या क्रमांकाची ठरली. सध्या बंगळूरकडून प्रत्येक मोसमाला विराट कोहलीला १५ कोटी रुपये मिळतात. मिल्सनंतर कोलकताने इंग्लंडच्याच अष्टपैलू ख्रिस वोक्‍सला ४.२ कोटी रुपये मिळाले. इयॉन मॉर्गन, जेसन रॉय आणि ख्रिस जॉर्डन या इंग्लंडच्या अन्य खेळाडूंनाही कोट्यवधी रुपयाची बोली लागली.

प्रथमच सहयोगी खेळाडू
अफगाणिस्तानचा अष्टपैलू महंमद नाबी, १८ वर्षाचा लेगस्पिनर रशीद खान, संयुक्त अरब अमिरातीचा फलंदाज चिराग सुरी हे पहिले सहयोगी देशातील खेळाडू ठरले. यात रशीदला हैदराबादने ४ कोटी रुपयाला खरेदी केले. सहयोगी खेळाडूसाठी ही सर्वाधिक बोली ठरली.

दिल्ली आक्रमक
लिलावाच्या सुरवातील दिल्ली फ्रॅंचाईजीने झटपट खेळाडूंची खरेदी केली. एंजेलो मॅथ्यूज, कॉरे अँडरसन, कागिसो रबाडा, पॅट कमिन्स अशा परदेशी खेळाडूंना पहिल्या नव्वद मिनिटांतच खरेदी केले. कोलकताने सर्वांत संथ खरेदी केली. पहिल्या 
२२ खेळाडूंमध्ये त्यांनी रसच दाखवला नाही. नंतर त्यांनी खरेदीस सुरवात केली. पण, त्यांची पहिली खरेदी ट्रेंट बोल्टची ठरली. त्यांनी त्याच्यासाठी ५ कोटी मोजले.

अनुभवी भारतीयांकडे पाठ
लिलावात भारताच्या इशांत शर्मा, इरफान पठाण, प्रग्यान ओझा, चेतेश्‍वर पुजारा, परवेझ रसूल, आर. पी. सिंग या प्रमुख खेळाडूंकडे फ्रॅंचाईजींनी पाठ फिरवली. पण, त्याच वेळी अनिकेत चौधरी, के. गौथम, टी. नटराजन, बसिल तपी, एकलव्य द्विवेदी, एम. आश्‍विन या नवोदित खेळाडूंना कोटीच्या घरात रक्कम मिळाली. गेल्या मोसमात सर्वाधिक ८ कोटी किंमत मिळालेल्या पवन नेगीला या वेळी दिल्लीने १ कोटी रुपयांना खरेदी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com