भारतीय व्हॉलिबॉलची संलग्नता पुन्हा धोक्‍यात

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

व्हॉलिबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतील संघर्षामुळे काही महिन्यांपूर्वी अव्वल 20 मध्ये असलेला भारतीय व्हॉलिबॉल संघ 42 व्या क्रमांकापर्यंत घसरला आहे. आता बंदी लांबली, तर आशियाई क्रीडा स्पर्धेपासून मुकावे लागेल.

मुंबई : जागतिक व्हॉलिबॉल महासंघाने भारतीय संघटनेस नव्याने निवडणूक घेण्यास सांगितल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. ही निवडणूक न झाल्यास भारतीय संघटनेस पुन्हा संलग्नता देण्यात येणार नसल्याचेही जागतिक महासंघाने स्पष्ट केले आहे. 

भारतीय व्हॉलिबॉल संघटनेतील वाद काही महिन्यांपासून सुरू आहे. अध्यक्ष चौधरी अवधेश कुमार आणि सचिव रामअवतारसिंग जाखर यांच्यातील संघर्ष न्यायालयात गेला. या संघर्षामुळे भारतीय संघटनेस जागतिक संघटनेने बडतर्फ केले. गत वर्षी एप्रिलमध्ये जाखर गटाने घेतलेली निवडणूक वैध असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिला आहे. 

जागतिक महासंघाने जुलैपूर्वी नव्याने निवडणूक घेण्याची सूचना करतानाच या वर्षाच्या एप्रिलमध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर जाहीर झालेली कार्यकारिणी तात्पुरती असल्याचा निर्णय दिला आहे. नव्याने निवडणूक न झाल्यास संलग्नता मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता नव्याने निवडणूक घेतल्यास न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होईल, अशी धास्ती जाखर यांना वाटत आहे. या संदर्भात आम्ही वकिलांचा सल्ला घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. 

संघर्षामुळे घसरण 
व्हॉलिबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतील संघर्षामुळे काही महिन्यांपूर्वी अव्वल 20 मध्ये असलेला भारतीय व्हॉलिबॉल संघ 42 व्या क्रमांकापर्यंत घसरला आहे. आता बंदी लांबली, तर आशियाई क्रीडा स्पर्धेपासून मुकावे लागेल.

2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत थोडक्‍यात हुकली होती आणि भारत पाचवा आला होता.