भारताने दक्षिण आफ्रिकेला 191 धावात रोखले

टीम ई सकाळ
रविवार, 11 जून 2017

भारताने चांगली कामगिरी केली असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 191 धावांत रोखण्यात भारताला यश मिळाले आहे.

लंडन : धावांचा मोठा डोंगर उभा करूनही चॅम्पियन्स करंडकात भारताला श्रीलंकेकडून पराभावाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आज (रविवार) होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने चांगली कामगिरी केली असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 191 धावांत रोखण्यात भारताला यश मिळाले आहे.

आज नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. आघाडीच्या फलंदाजांनी 76 धावांची भागीदारी केली. मात्र अश्‍विनच्या गोलंदाजीवर अठराव्या षटकात हशीम आमला (54 चेंडूत 35 धावा) बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉकशिवाय (72 चेंडूत 53 धावा) अन्य कोणीही मैदानावर फार काळ तग धरू शकले नाही. फाफ दू प्लेसिस 50 चेंडूत 36 धावा तर एबी डिव्हीलियर्सही 12 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर तळातील तब्बल पाच फलंदाजांना वैयक्तिक दोन आकडी धावांपर्यंत पोहोचता आले नाही. तर जीन पॉल ड्युमिनी 20 धावा करून नाबाद राहिला. भारताच्या वतीने भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर रविचंद्रन अश्‍विन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चॅम्पियन्स करंडकातील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेलाही हा सामना जिंकणे आवश्‍यक आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ या मालिकेतून बाहेर पडणार आहे.