गोलंदाजी क्रमवारीत जडेजा अग्रस्थानी

पीटीआय
बुधवार, 22 मार्च 2017

नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे.

नवी दिल्ली - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा याने आपलाच सहकारी ऑफस्पिनर आर. अश्‍विन याला मागे टाकून ‘आयसीसी’च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे. त्याचवेळी चेतेश्‍वर पुजाराने फलंदाजीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अश्‍विनला आलेले अपयश त्याला मागे राहण्यास कारणीभूत ठरले. जडेजाने या अनिर्णित राहिलेल्या सामन्यात ९ गडी बाद केले. या कामगिरीमुळे संयुक्त अग्रस्थानी असणारी जोडी फुटली. जडेजाने अश्‍विनवर ३२  गुणांची आघाडी घेतली. क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा जडेजा भारताचा अश्‍विन आणि बेदी यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला. 

फलंदाजीत चेतेश्‍वर पुजारा याने चार क्रमांकाची झेप घेत कारकिर्दीमधील सर्वोच्च दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची द्विशतकी खेळी त्याच्या पथ्यावर पडली. त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यम्सन, इंग्लंडच्या ज्यो रुट आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांना मागे टाकले. विल्यम्सन पाचव्या स्थानावर फेकला गेला. रुट तिसऱ्या, तर कोहली चौथ्या स्थानावर राहिला. अग्रस्थान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने कायम राखले. 

दुसऱ्या स्थानासाठी चुरस
आयसीसीच्या मानांकन पद्धतीनुसार एक एप्रिलपर्यंतची कामगिरी ग्राह्य धरली जाते. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून अग्रस्थान निश्‍चित केले. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका संघांत चुरस आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाला गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाला आता दुसरे स्थान टिकविण्यासाठी भारताविरुद्धच्या चौथा कसोटी सामना किमान अनिर्णित राखावा लागेल. ऑस्ट्रेलिया हरल्यास आणि दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकला किंवा अनिर्णित राखल्यास ते दुसऱ्या स्थानावर येतील. अव्वल स्थानावरील भारतीय संघाला १० लाख डॉलर मिळतील. दुसऱ्या क्रमांकावरील संघास ५ लाख, तर तिसऱ्या क्रमांकावरील संघास २ लाख डॉलरचे पारितोषिक मिळेल. चौथा क्रमांक इंग्लंडचा असून, त्यांना एक लाख डॉलर मिळतील.

Web Title: Jadeja bowling rankings top