तो आला.... शेवटपर्यंत लढला आणि जिंकला !

dinesh Karthik
dinesh Karthik

जिंकण्याकरता शेवटच्या चेंडूवर षटकार हवा होता, सर्व भारतीयांचे श्वास रोखले गेले होते आणि कोट्यवधी क्रिकेटवेडे प्रार्थना करत होते. सगळ्यांच्या नजरा होत्या त्या दिनेश कार्तिकवर. खरे तर प्रत्येक खेळाडूला वाटत असतं की आपण अशी कामगिरी करावी जेणे करून आपण सदैव प्रेक्षकांच्या मनात घर करून राहू. असा दुर्मिळ क्षण निवडक खेळाडूंच्या नशिबी येतो. काल झालेल्या निदहास चषकाच्या अंतिम सामन्यात हा योग्य दिनेश कार्तिकच्या वाट्याला आला. 

अखेरच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार मारला आणि सर्व भारतीयांनी एकच जल्लोष केला. बांगलादेशवर ४ गडी राखून मात केली आणि तिरंगी मालिकेचं विजेतेपद पटकावलं. यावेळी सोशल मीडियावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. दिनेश कार्तिकचंही सर्वत्र कौतुक झालं. आठच चेंडूच्या खेळीत कार्तिकने कौशल्य, ताकद, आणि टाइमिंगच्या जोरावर सुपेरहिरोच्या स्थानावर झेप घेतली. चेंडुप्रमाणे फटके मारायला लागणारे कौशल्य तासंतास केलेल्या सरावातून येते. त्याने पहिला षटकार लो फुलटॉस वर लॉंग ऑनला मारला. दुसरा षटकार केवळ अप्रतिम होता. चेंडूला असामान्य टायमिंगने त्याने स्केअर लेगला स्टँडमध्ये भिरकावले. शेवटचा षटकार म्हणजे एक्सट्रा कव्हरला फ्लॅट सीमारेषेबाहेर. प्रचंड ताकदीने मारलेला फटका होता हा. कारण सौम्या सरकारचा हा चेंडू खूप वेगवान नव्हता. केवळ बॅटच्या स्पीडमुळे षटकार गेला. या खेळीत त्याने प्रत्येक चेंडूची दिशा ओळखली आणि त्यानुसार फटकेबाजी केली. शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खोल असेल हा त्याने बांधलेला अंदाज मास्टर स्ट्रोक ठरला. हे सर्व करताना त्याचा स्वतःच्या क्षमतेवर गाढ विश्वास असल्याने त्याचे चित्त कमालीचे स्थिर होते. सामना संपल्यावर दिलेल्या मुलाखतीत असे गुण अनुभवातून येते असे नमूद केले. 

अंतिम फेरीत आपल्या आधी मालिकेत एकही सामना न खेळलेल्या विजय शंकरला फलंदाजीसाठी पाठवले, तेव्हा दिनेश चांगलाच वैतागला होता. त्याचे आणि रोहितचे चांगलेच वाजले. अशी परिस्थिती काही वेळा आपल्यातील राग, जिंकण्याची जिद्द बाहेर काढण्याचे काम करत असते. आणि नेमके तेच झाले. पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकत मला उशिरा फलंदाजीला का पाठवले, हे दाखवून दिले. सामन्यातील १८व्या षटकात फक्त एकच धाव गेली होती. पण कार्तिकने १९ व्या षटकात २२ धावा वसूल केल्या. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विजय शंकर बाद झाला आणि अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. दिनेश स्ट्राईकवर होता. कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. अन मैदानावर सुरु झाला एकच जल्लोष. 

दिनेश कार्तिक यापुढेही खेळेल, नवे विक्रम रचेल, परंतु बांग्लादेशच्या विरोधात निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा क्षण कार्तिकची ओळख ठरणार आहे, त्याला तो क्षण आयुष्यभर साथ देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com