मुंबई जिंकल्यावरही जागतिक पात्रता धूसर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी मुंबई मॅरेथॉन पात्रता स्पर्धा असली तरी केनिया आणि इथिओपियाच्या धावपटूंसाठी ही शर्यत जिंकूनही पात्रता मिळेल, याची खात्री नाही. मुंबई मॅरेथॉन जिंकण्याचेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे मत सेबोका दिबाबा, दिक्‍नेश मेकाश आणि लेवी मेतेबा यांनी व्यक्त केले. 

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनच्या एलिट धावपटूंची यादी आज जाहीर झाली. महिलांमध्ये यापूर्वी दोनदा विजेतेपद मिळवणारी मेकाश यंदा तिसऱ्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे, तर पुरुषांमध्ये लेवी मेतेबा आणि सेबोका दिबाबा यांच्यात चुरस असेल. आमच्या देशात जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यासाठी मोठी चुरस असते. आम्ही मुंबईत पात्रता निकष पार केला तरी पात्र होऊ असे नाही. कारण, आमच्या देशांमध्ये महत्त्वाच्या मॅरेथॉनमध्ये मिळणाऱ्या गुणांना प्राधान्य देऊन त्यातून अंतिम निवड करण्यात येईल, असे या तिघांनीही सांगितले. 

मेकाशसाठी यंदाची शर्यत प्रतिष्ठेची ठरणार आहे. या स्पर्धेत अद्याप कोणालाही तीनदा विजेतेपद मिळवता आलेले नाही. मेकाशने 2014 आणि 15 मध्ये ही शर्यत जिंकली होती. मी जास्त विचार करत नाही. केवळ धावण्यावरच भर देते, असे तिने सांगितले. यंदाची तयारीही उत्तम असल्याचे ती म्हणाली. केनियाचा मेतेबो म्हणाला, मी प्रथमच मुंबईत धावणार आहे. शर्यतीचा मार्ग चढ-उताराचा असल्याचे ऐकले आहे. एक-दोन दिवसांत मी या मार्गाची पाहणी करणार आहे आणि त्यानुसार कोणत्या टप्प्यावर वेग वाढवावा लागणार, याची तयारी करणार आहे. 

मॅरेथॉन स्पर्धेसाठी पेसमेकर महत्त्वाची भूमिका बजावत असतात; पण आपल्यावर त्याचा परिणाम होत नाही. मी पेसमेकरशिवाय धावू शकतो. इतर स्पर्धक हेच आपल्यासाठी पेसमेकर असल्याचे मेतेबोने सांगितले.