सुपर श्रीकांतचा जेतेपदाचा धडाका

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जिंकताना ऑलिंपिक विजेत्यास हरवले

मुंबई - किदांबी श्रीकांतची जागतिक बॅडमिंटन कोर्टवरील स्वप्नवत हुकूमत सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. त्याने ऑलिंपिक विजेत्या चेन लाँग याला प्रतिकाराची फारशी संधी न देता ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 

ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज जिंकताना ऑलिंपिक विजेत्यास हरवले

मुंबई - किदांबी श्रीकांतची जागतिक बॅडमिंटन कोर्टवरील स्वप्नवत हुकूमत सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिली. त्याने ऑलिंपिक विजेत्या चेन लाँग याला प्रतिकाराची फारशी संधी न देता ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 

सिंगापूर ओपनच्या उपविजेतेपदापासून सुरू झालेली श्रीकांतची यशस्वी वाटचाल जास्तच भक्कम होत असल्याची प्रचिती सिडनीत मिळाली. त्याने आज जणू अंतिम फेरीतही दडपण न घेता खेळ कसा करता येतो, प्रतिस्पर्ध्याला त्याच्याच भक्कम बाजूत कसे अडकवता येते, हे दाखवून दिले. हे करताना तो आक्रमणाची कोणतीही संधी सोडत नव्हता. नेटजवळील नाजूक फटक्‍यात हुकूमत राखत होता. एवढेच नव्हे तर दीर्घ रॅलीजना तयार होता. त्याने या लढतीत २२-२०, २१-१७ बाजी मारली. 

श्रीकांत आणि चेन लाँग लढतीचा निर्णय एका रॅलीजने केला, असे म्हटले तर अयोग्य नसेल. दीर्घ रॅली जिंकणे ही लाँगची खासियत. दुसऱ्या गेमच्या सुरवातीस अशीच एक लाँग रॅली सुरू झाली. २५ हून जास्त वेळा शटल फटकावले गेले होते. चेन ही रॅली जिंकणार अशीच बॅडमिंटन अभ्यासकांची खात्री होती; पण श्रीकांतने अप्रतिम डाऊन दी लाईन स्मॅश मारताना लाँगला जागेवरून हलण्याचीही संधी दिली नाही. त्यानंतर लाँगच्या खेळातील आत्मविश्‍वासच कमी होत गेला. 

श्रीकांतचा खेळ उंचावण्यास सुरवात झाल्यावर लाँगचा खेळ खालावतच गेला. त्याच्या दीर्घ रॅलीज लुप्त झाल्या. त्याचा शटलचा अंदाज चुकण्यास सुरवात झाली. हुकमी ड्रॉप्स करताना शटलचा वेग अपेक्षित नव्हता. हे कमीच की काय त्याच्या शॉर्ट सर्व्हिसनेच श्रीकांतला मॅच पॉईंट दिला. त्यानंतर बेसलाईनजवळ फसव्या रॅलीज करण्यात वाक्‌बगार असलेल्या लाँगची हीच रॅली चुकली आणि श्रीकांतचे विजेतेपद निश्‍चित झाले. सामन्यात परतण्याची श्रीकांत एक तरी संधी देईल, ही लाँगची अपेक्षा फोल ठरली. 

पाऊण तासाच्या लढतीत श्रीकांतने त्याची योजना अमलात आणली. त्याने आक्रमक टॉसला जबरदस्त नेटजवळील रॅलीची जोड दिली. त्याने उडी मारत मारलेल्या स्मॅशचा केलेला वापरही प्रभावी होता. सामन्याच्या सुरवातीस श्रीकांतच्या चुका झाल्या; पण लाँगच्या दीर्घ रॅलीजनी प्रत्युत्तर देत आहोत हे पाहिल्यावर श्रीकांतचा आत्मविश्‍वास उंचावला. सुरवातीस आक्रमक असलेला लाँग बचावात्मक झाला आणि हे जणू श्रीकांतच्या पथ्यावर पडले. हे त्याने विजेतेपद मिळवून सिद्ध केले.

स्पार्कलिंग श्रीकांत
इंडोनेशियन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या लागोपाठच्या दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला पहिला खेळाडू
सलग दोन सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेला पहिला भारतीय पुरुष खेळाडू. यापूर्वीचा भारतीय विक्रम साईना नेहवालचा
दोन सुपर सीरिज (इंडिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन), तसेच दोन सुपर सीरिज प्रीमियर (चीन ओपन आणि इंडोनेशियन ओपन) जिंकलेला पहिला भारतीय
जागतिक, तसेच ऑलिंपिक विजेत्या चेन लाँगला प्रथमच हरवले. यापूर्वीच्या पाच लढतींत पराभव
सलग तीन सुपर सीरिज स्पर्धांत अंतिम फेरी गाठलेला पहिला भारतीय; तर एकंदरीत पाचवा
लीन दान, लीन चाँग वेई, बाओ चुनलाई, सोनी द्वी कुनकोरो व चेन लाँग यांच्याकडून यापूर्वी ही कामगिरी

भले शाब्बास

मन की बात’मध्ये व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
- पंतप्रधान कार्यालय

श्रीकांतच्या झुंजार खेळाने शान उंचावली. स्टीम रोलरला बॅटल टॅंकच भेट द्यायला हवा. मी त्याला महिंद्र टीयूव्ही-३०० देत आहे.
- आनंद महिंद्रा

श्रीकांत या क्‍लासिक विजेतेपदाबद्दल अभिनंदन! आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला पाच लाखांचे बक्षीस जाहीर करीत आहोत.
- हिमंता बिश्‍व शर्मा, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष

भारतीय बहरात असताना आता जणू प्रत्येकाला विजेतेपद जिंकणे अवघड होत आहे. काँग्रॅट्‌स श्रीकांत.
- एच. एस. प्रणॉय

श्रीकांत जबरदस्त जोशात आहे, मस्तच. त्याचे खूप खूप अभिनंदन! हीच यशोमालिका सुरू राहो.
- सानिया मिर्झा

सलग दुसरी सुपर सीरिज जिंकलेल्या श्रीकांतचे हार्दिक अभिनंदन! तुझ्या यशाचा अभिमान वाटतो.
- सचिन तेंडुलकर