कोहलीच अव्वल; कुलदीपची गोलंदाजीत प्रगती

कोहलीच अव्वल; कुलदीपची गोलंदाजीत प्रगती

दुबई : भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करताना आयसीसी क्रमवारीत फलंदाजीत सर्वाधिक 911 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. गोलंदाजीत कुलदीप यादवने प्रथमच पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळवीत सहावे स्थान पटकाविले आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव होऊनही भारतीय खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमावारीत वाढ झाली आहे. विराट कोहलीने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 75, 45 आणि 71 धावा केल्या. त्याच्या गुणांमध्ये दोन गुणांची वाढ होऊन त्याचे आता 911 गुण झाले आहेत. विराट कोहलीचे सध्या आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक गुण आहेत. यापूर्वी 1991मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डिन जोन्स यांचे 918 गुण होते. 

कुलदीप यादवने प्रथमच पहिल्या दहांत स्थान मिळवले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या कुलदीपने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत नऊ विकेट घेतल्या आणि त्यामुळेच त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. कुलदीप पहिल्या दहांमध्ये असलेला भारताचा तिसरा गोलंदाज आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रित बुमरा पहिल्या स्थानावर आहे, तर फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल दहाव्या स्थानावर आहे. तसेच कुलदीप हा पहिल्या दहामध्ये असलेला पाचवा फिरकी गोलंदाज आहे. यापूर्वी राशिद खान (पहिला), इम्रान ताहिर (सातवा), आदिल राशिद (आठवा) आणि युझवेंद्र चहल (दहावा) हे फिरकी गोलंदाज पहिल्या दहांमध्ये आहेत. 

इंग्लंडचा फलंदाज ज्यो रुट याने एकदिवसीय मालिकेत केलेल्या सलग दोन शतकांमुळे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू क्रमवारीतही बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थान टिकवून आहे. सांघिक क्रमवारीत इंग्लंड 127 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताला एक मानांकन गुण गमवावा लागला असून, ते 121 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com