फुटबॉल स्पर्धेत हुबळी, बेळगाव संघाची विजयी सलामी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला आज दिमाखात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बेळगावच्या दर्शन युनायटेड, फ्रेंडस क्‍लब आणि हुबळीच्या गांधीवाडा क्‍लबने विजयी सलामी दिली. सोलापूरचा एसएसआय, पुसदचा चेतना क्‍लब आणि स्थानिक मास्टर स्पोट्‌सचे आव्हान संपूष्टात आले. 

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला आज दिमाखात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी बेळगावच्या दर्शन युनायटेड, फ्रेंडस क्‍लब आणि हुबळीच्या गांधीवाडा क्‍लबने विजयी सलामी दिली. सोलापूरचा एसएसआय, पुसदचा चेतना क्‍लब आणि स्थानिक मास्टर स्पोट्‌सचे आव्हान संपूष्टात आले. 

सकाळच्या सत्रातील पहिला सामन्यात दर्शन युनायटेडने पुसदचा चेतना फुटबॉल क्‍लब निर्णायक एक गोल करत विजय मिळविला. बेळगाव संघाला पेनाल्टी क्षेत्राबाहेर फ्री कीक मिळाली. किरण चव्हाणचा फटका पुसदच्या गोलरक्षकाने अडविला. बेळगावच्या किरण चव्हाण याच्या क्रॉसवर अभय संभाजीचे याने उत्कृष्ठ गोल नोंदविला. 

हुबळीच्या गांधीवाडा स्पोर्टसने सोलापूरच्या एस.एस.आय.ला एका गोलने नमविले. या संघाच्या विनय, सनी, थॉमस यानीं उत्कृष्ठ खेळ केला. सोलापूरच्या शुभम पोवार, राजू धलगुनडे, प्रदीप अलट यांचे प्रयत्न अपुरे पडले. 

शेवटच्या सामन्यात बेळगावच्या फ्रेंडसने मास्टर स्पोर्टसला ट्रायबेकर मध्ये 5-3 असे हरविले. निर्धारीत वेळेत मास्टरच्या सुर्याजी सरदेसाई याने गोल करुन तर बेळगावच्या अभिषेक चेरेकरने पेनाल्टीवर गोल नोंदवून बरोबरी साधत रंगत आणली. बेळगावकडून रॉक्‍सन स्वॅमी, फ्रान्सीस डिसोझा, अभिषेक चेरेकर, आमिन पिरजादे, श्रीनंद पाटील तर मास्टर कडून सचिन बारामती, किरण कावणेकर, राहूल चौगुले यांनी गोल नोंदविले. बेळगावचा गोलरक्षक आमिनने पेनल्टीचा फटका अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला.

दरम्यान, दुपारी दोन वाजता केदारी रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर, हसन मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. जे.बी. बारदेस्कर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सचिव दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. युनायटेडचे अध्यक्ष जगदीश पट्टणशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. सतीश घाळी, अरुण कलाल, निशीकांत गोरुले, नागेश चौगुले, विश्‍वास देवाळे, जि.प. सदस्य सतीश पाटील, सुरेश कोळकी, सुनिल चौगुले, सतीश पोवार, महादेव पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष संभाजी शिवारे यांनी आभार मानले. किरण म्हेत्री यांनी सूत्रसंचालन केले. 

मैदानावर माजी ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू बसवराज शिंत्रे यांना आदरांजली वाहण्यात आली. आजच्या सामन्यातील उत्कृष्ठ खेळाडू अभय संभाजीचे, ईझॅक, फ्रान्सिस डिसोझा, तर लढवय्या खेळाडू एस.के. जावेद, श्रेयस पाटील, आदित्य रोटे यांचा गौरव झाला.