मणिपूर ईस्टर्न स्पोर्टिंग अंतिम फेरीत

मणिपूर ईस्टर्न स्पोर्टिंग अंतिम फेरीत

कोल्हापूर - स्पोर्टस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया संघाचा ५-० असा पराभव करत मणिपूरच्या ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन संघाने अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी ओडिशाचा ‘रायझिंग’ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अन्य सामन्यांत युनायटेड वॉरिअर्स स्पोर्टिंग क्‍लबने चांदणी स्पोर्टिंग क्‍लबचा ४-१ असा पराभव केला. मुंबई रश सॉकर्स आणि हंस वुमेन फुटबॉल क्‍लब यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेची सांगता झाली. 

सकाळच्या सत्रात आज पहिला सामना स्पोर्टस्‌ ॲथॉरिटी ऑफ इंडिया विरुद्ध ईस्टर्न स्पोर्टिंग युनियन संघात झाला. ईस्टर्नच्या खेळाडूंनी संघाला साजेसा खेळ करत सामन्यावर एकतर्फी वर्चस्व ठेवले. स्पर्धेच्या २९ व्या मिनिटाला ईस्टर्न संघाच्या वेनबम रजनीबाला देवी हिने २९ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. यानंतर ३७ व्या मिनिटाला कशिमा हिने गोल करत ईस्टर्न संघाचा दुसरा गोल नोंदवला. पूर्वार्धात ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात कशिमा हिने ६३, ७९ आणि ९० व्या मिनिटाला असे एकापाठोपाठ तीन आणि व्यक्तिगत चार गोल नोंदवत ईस्टर्न संघास ५-० अशा गोल फरकाने विजय मिळवून दिला. ईस्टर्न संघाची मायानयमन अचोबी ही सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. 

दुसरा सामना युनायटेड वॉरिअर्स स्पोर्टिंग क्‍लब विरुद्ध चांदणी स्पोर्टिंग क्‍लब यांच्यात झाला. तुल्यबळ युनायटेड संघास चांदणी संघाने चांगलीच टक्कर दिली. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात युनायटेड संघाच्या सलमा रिनारॉय देवी हिने ५३ व ५९ व्या मिनिटाला दोन गोल करत संघास भक्कम आघाडी मिळवून दिली. गोल फेडीसाठी चांदणी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. संघाच्या देबनिता रॉय हिला ७० व्या मिनिटाला गोल करण्यात यश मिळाले. त्यामुळे २-१ अशी सामन्याची स्थिती झाली. यानंतर मात्र सामन्याची सर्व सूत्रे युनायटेड संघाने हाती घेतली. अनिता रावत हिने ७१ व्या, तर अंजू तमंग हिने ७३ व्या मिनिटाला गोल नोंदवून युनायटेड संघास ४-१ असा विजय मिळवून दिला. सामनावीर म्हणून सलमा रिनारॉय देवीला गौरविले. 

तिसरा सामना मुंबई रश सॉकर विरुद्ध हंस वुमेन्स फुटबॉल क्‍लब यांच्यात झाला. रशच्या निशा, सुमर्या आणि लालमपरीच्या सोप्या संधी वाया गेल्या. हंसची वंशिका राणा हिने उत्कृष्ट गोलरक्षण करत आक्रमणे परतावून लावली. हंसच्या ज्योतीने उत्तरार्धात फ्री कीकवर मारलेला चेंडू रश संघाच्या बनिता हिने अप्रतिमरित्या अडवला. अखेरीस हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. रश संघाच्या हुद्रीम रणजिता देवी हिला सामनावीरचा मान मिळाला. केएसएतर्फे या स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com