महाराष्ट्राच्या मल्लांना येणार ‘अच्छे दिन’?

महाराष्ट्राच्या मल्लांना येणार ‘अच्छे दिन’?

कोल्हापूर - महाराष्ट्र तसे म्हटले तर मल्लांची खाण. अनेक नामवंत मल्ल या मातीत घडले. काळ बदलला, तसा मल्लांचा खर्च वाढत गेला. सध्या एका मल्लाचा खुराकाचा खर्च २० ते २५ हजारांच्या घरात आहे. बदाम सातशे ते आठशे रुपये किलो, तूप पाचशे रुपये किलो, नुसते खर्चाचे आकडे ऐकले तरी पहिलवानकी आता परवडत नसल्याचे स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या तुलनेत पंजाब, हरियाना आणि दिल्ली येथील मल्लविद्या पुढे गेली की ती सरकारच्या पाठिंब्यामुळे, महाराष्ट्रात पुणे जिल्हा वगळता असा राजाश्रय अन्य जिल्ह्यांत नजरेस पडत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील कुस्ती केवळ किताबापुरती मर्यादित राहिली आहे.

काही वर्षांपूर्वी हरिश्‍चंद्र बिराजदार, मारुती माने, विष्णू सावर्डे, श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, दादू चौगुले, दिवंगत युवराज पाटील अशी मल्लांची खाणच उभी राहिली. अगदी आप्पालाल शेखपर्यंत ही परंपरा कायम होती. काळाच्या ओघात कुस्तीचे नियम बदलले, मातीवरील कुस्ती मॅटवर आली, गुणांची गोळाबेरीज सुरू झाली आणि चितपट कुस्ती मारण्याची कलाच संपुष्टात आली. आजही राज्यात कुस्तीची ‘दंगल’ असली की पंजाब, हरियानाचेच मल्ल नजरेस पडतात. क्रमांक एकच्या कुस्तीसाठी महाराष्ट्रातून जोड शोधण्याची वेळ येते. ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा मिळाली की, राज्य सरकार नोकरीत सामावून घेते खरे; पण एखादे पद मिळाले की संबंधिताची हयात नोकरीत जाते. हरियाना, पंजाब राज्यांमध्ये नेमके उलटे चित्र आहे. राष्ट्रीय विजेता झाला की नोकरी तर मिळतेच; पण कुस्ती कलेला विजेता वाहून घेतो इतकी मोकळीक दिली जाते.

राज्यात जे तरुण मल्ल मोठे आहेत ते स्वतःच्या ताकदीवर. पुण्याचा अभिजित कटके, साताऱ्याचा किरण भगत, सागर बिराजदार, माउली जमदाडे, शिवराज राक्षे, चंद्रहार पाटील, विकी जाधव, योगेश बोंगाळे, कौतुक डाफळे, विलास डोईफोडे हे नव्या दमाचे मल्ल आहेत. भूगाव (जि. पुणे) येथे २० डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशनासाठी या मल्लांच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले आहे.

अधिवेशन आले की कुस्तीची चर्चा होते, पुढे वर्षभर जो तो आपल्या आखाड्यात अशी स्थिती होते. पूर्वी कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर मानले जायचे. आजही ग्रामीण भागातील मुले मेहनतीने पुढे येत आहेत. सहकारी साखर कारखाने तसेच जत्रा-यात्रांनी कला टिकवून ठेवली आहे. पहिलवान दत्तक घेणे ही बाब परवडत नाही. त्यामुळे वर्षातून एकदा जंगी मैदान भरते.

पुणे जिल्ह्यात युवा मल्लांना पुरस्कृत करून त्यांचा खर्च उचलण्यास संस्था पुढे येत आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात पुणे हेच कुस्तीचे माहेरघर बनू शकेल, असे सध्याचे तरी चित्र आहे.

महिला कुस्तीलाही फारशी गती मिळालेली नाही. कोल्हापूरची रेश्‍मा माने ही स्वतःच्या ताकदीवर उभी आहे. राज्याच्या अन्य भागांतून हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्‍याच मुली या क्षेत्रात उतरत आहेत.

कुस्तीत चौदा, सतरा आणि एकोणीस वयोगटांच्या जिल्हानिहाय ॲकॅडमी तयार होत नाहीत, तोपर्यंत कुस्तीला ‘अच्छे दिन’ येणार नाहीत. स्वयंसेवी संस्था स्वतःच्या ताकदीवर शंभर मल्लांचे पालकत्व घेत आहेत. राज्य सरकारने पुढाकार घेऊन पंजाब, हरियाना, दिल्लीच्या धर्तीवर मल्लांचे पालकत्व घ्यावे. नोकरी दिली म्हणजे कर्तव्य संपते असे नाही, तर संबंधित मल्लास कुस्तीसाठी आणि प्रशिक्षणास मोकळीक द्यायली हवी तरच त्याच्या हातून भावी मल्ल तयार होतील.
- अमृता भोसले,  ‘उप-महाराष्ट्र केसरी’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com