साईना, सिंधूसमोर खडतर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाचा पूर्ण आनंद घेण्यापूर्वीच सिंधू मलेशियन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेस सज्ज झाली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत साईनासमोर पहिल्या फेरीतच खडतर आव्हान असेल.

मुंबई - इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपदाचा पूर्ण आनंद घेण्यापूर्वीच सिंधू मलेशियन सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धेस सज्ज झाली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत साईनासमोर पहिल्या फेरीतच खडतर आव्हान असेल.

इंडिया ओपनपेक्षा अनेक स्पर्धकांसाठी ही स्पर्धा जास्त महत्त्वाची आहे. दिल्लीतील स्पर्धा सुपर सीरिज मालिकेतील होती, तर मलेशिया ओपन ही सुपर सीरिज प्रीमियर मालिकेतील आहे. सिंधूला सहावे मानांकन आहे, तर साईनाला मानांकन क्रमवारीत स्थानही नाही, यावरून स्पर्धा किती खडतर आहे, हे लक्षात येईल.

साईनाने गतवर्षीच्या जानेवारीनंतर एकाही सुपर सीरिज स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीही पार केलेली नाही. त्यामुळेच तिला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत दुसरी असल्याने अकेन यामागुची हिचे आव्हान असेल. यामागुचीने यंदा कोरिया, डेन्मार्क तसेच जर्मन ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. ती चांगलीच बहरात आहे आणि तिची संभाव्य विजेतीत गणना होत आहे. या दोघीतील एकमेव लढत साईनाने जिंकली आहे; पण तो विजय 2014 मधील होता. आता साईनाने सलामीच्या दोन फेऱ्या जिंकल्यास आठवी मानांकित ही बिंगजिओ साईनाची डोकेदुखी ठरू शकेल.

सिंधूचा खरा कस या स्पर्धेत लागेल, असे मानले जात आहे. तिने यंदा तेरापैकी बारा लढती जिंकल्या आहेत. ती एकमेव लढत तई झु यिंग हिच्याविरुद्ध हरली. यिंग जागतिक क्रमवारीत अव्वल आहे.

तिच्याविरुद्धच सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत लढत होईल. त्यापूर्वी पहिल्या फेरीतील लढत सोपी नसेल. चीनची चेन युफेई ही तिची प्रतिस्पर्धी आहे. दोघीत यापूर्वी एकही लढत झालेली नाही.

माझ्या हालचाली चांगल्या होत आहेत. सिंधूला दिल्लीत चांगली लढत दिली. मलेशियातील ड्रॉ खडतर आहे; पण खडतर लढतींचा फायदाच होतो.
- साईना नेहवाल