श्रीकांतचा जगज्जेत्या व्हिक्‍टरला धक्का 

File Photo
File Photo

ओडेन्स (डेन्मार्क) : भारताचा प्रतिभासंपन्न बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याने मातब्बर प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी त्याने जगज्जेत्या तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्‍टर ऍक्‍सेलसनला 14-21, 22-20, 21-7 असे हरवून सनसनाटी निकाल नोंदविला. 

व्हिक्‍टरविरुद्ध श्रीकांतला आधीच्या तीन लढतींत पराभूत व्हावे लागले होते. ही अपयशी मालिका त्याने यावेळी खंडित केली. 56 मिनिटे चाललेली लढत पहिल्या गेमच्या पिछाडीवरून जिंकत त्याने जोरदार खेळ केला. व्हिक्‍टर घरच्या कोर्टवर खेळत असल्यामुळे त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. 6-1 अशी आघाडी घेत त्याने सुरवात चांगली केली. हे वर्चस्व त्याने 11-6 असे वाढविले. श्रीकांतने सलग सहा गुण जिंकले, पण त्यानंतर त्याचे फटके चुकले. दोन वेळा व्हिक्‍टर कोर्टवर अवघडलेल्या स्थितीत होता, पण त्याने चपळाईच्या जोरावर यशस्वी प्रत्युत्तर दिले. सात गेम पॉइंट मिळवीत त्याने श्रीकांतवर दडपण आणले. यामुळे श्रीकांतचा स्मॅश बाहेर गेला. 

दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने 5-3 अशी आघाडी घेतली. व्हिक्‍टरचा बेसलाइनवरून अंदाज चुकला आणि त्याचा फटका नेटमध्ये गेला. श्रीकांतने 10-7 अशी आघाडी वाढविली. तेव्हा व्हिक्‍टर नेटपाशीच चुकला. मग व्हिक्‍टरने दोन ताकदवान स्मॅश मारले. त्यामुळे पिछाडी 10-11 अशी कमी झाली. श्रीकांतने दोन वेळा अचूक अंदाज बांधत फटके मारले, तर व्हिक्‍टरचे फटके चुकले. त्यामुळे श्रीकांत 15-14 असा आघाडीवर होता. व्हिक्‍टरने 18-16 अशी आघाडी घेताना सरस खेळ केला. श्रीकांतचा एक फटका बाहेर गेला. नेटजवळील रॅलीत व्हिक्‍टर सरस ठरला. तेव्हा तो 19-17 असा पुढे होता, पण श्रीकांतने प्रतिआक्रमण रचले. 20-19 अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने रेषेलगत जोरदार स्मॅश मारला. त्यानंतर व्हिक्‍टरचा नेटजवळ पुन्हा फटका चुकला. यामुळे श्रीकांत बरोबरी गाठू शकला. 

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये व्हिक्‍टरने 3-1 अशी आघाडी घेतली. श्रीकांतने सलग चार गुण जिंकले. यातही व्हिक्‍टर नेटजवळ निष्प्रभ ठरला. त्यानंतर व्हिक्‍टरचे फटके चुकू लागले. श्रीकांतच्या खात्यात 4-11 अशी आघाडी जमा झाली. त्याने मग व्हिक्‍टरला संधी अशी दिलीच नाही. 

मॅरेथॉन मुकाबला 
श्रीकांतने गुरुवारी कोरियाच्या जीन हिऑक जिऑन याचे आव्हान 21-13, 8-21, 21-18 असे परतवून लावले होते. हा मॅरेथॉन सामना तब्बल एक तास 51 मिनिटे चालला होता. 

प्रणॉय पराभूत 
दरम्यान, शुक्रवारी एच. एस. प्रणॉयला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोरियाच्या सॉन वॅन हो याने 21-13, 21-18 असे हरविले. प्रणॉय म्हणाला की, मी बऱ्याच चुका केल्या, त्यामुळे सॉनला गुण जिंकण्यासाठी प्रयत्न असे फार करावे लागले नाहीत. त्याच्याविरुद्ध संयम राखायला हवा याची मला जाणीव होती, पण मी तो राखू शकलो नाही. हा दिवस असा होता की जेव्हा काहीच जुळून आले नाही. 

व्हिक्‍टरवरील विजय मनोधैर्य उंचावणारा आहे. इंडिया ओपन व जपान ओपनमध्ये मी त्याच्याकडून हरलो होतो. त्यामुळे जिंकण्याचा निर्धार होता. कोर्टशी जुळवून घेण्यास मला बराच वेळ लागला, पण मी संयम बाळगला. चुका कमी केल्या. तिसऱ्या गेममध्ये त्याने वेगळे प्रयत्न करून पाहिले, पण मी ते यशस्वी ठरू दिले नाहीत. 
- किदांबी श्रीकांत, भारतीय बॅडमिंटनपटू 

साईनाने गुरुवारी थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलला 22-20, 21-13 असे हरविले होते. हा सामना 42 मिनिटे चालला होता. 

मला पुरेशी विश्रांती मिळू शकली नाही. मी कधीही पहाटे तीन वाजता झोपले नव्हते. त्यामुळे माझे अंग अवघडले होते, पण यामागुचीने चांगला खेळ केला, असे मी म्हणायला हवे. लागोपाठ सामने खेळण्यासाठी मला बरीच तयारी करावी लागली, पण या बाबतीत माझा नाइलाज होता. यानंतर मी फ्रेंच ओपनमध्ये खेळेन. 
- साईना नेहवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com