भारताचे पाच पुरुष बॅडमिंटनपटू जागतिक क्रमवारीत अव्वल 25 मध्ये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे. 

नवी दिल्ली : जपान ओपन सुपर सिरीज भारतीय बॅडमिंटनपटूंना अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही भारताच्या पाच पुरुष बॅडमिंटनपटूंनी जागतिक क्रमवारीत अव्वल पंचवीसमध्ये स्थान मिळवले आहे. 

भारतीय बॅडमिंटन म्हणजे पी. व्ही. सिंधू, साईना नेहवालच नव्हे हेच पुरुष खेळाडू दाखवून देत आहेत. जपान स्पर्धेत सिंधू आणि साईना दुसऱ्या फेरीतच पराजित होत असताना श्रीकांत किदांबी आणि एच. एस. प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरी गाठली. या कामगिरीमुळे त्यांनी 5 हजार 40 गुण मिळवले. श्रीकांतने गतवर्षीही उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, त्यामुळे त्याने हे गुण राखले आहेत. त्यामुळे तो जागतिक क्रमवारीत 58 हजार 583 गुणांसह आठव्या क्रमांकावर कायम आहे. 

प्रणॉय गतवर्षी दुसऱ्या फेरीत पराजित झाला होता. पण प्रतिस्पर्ध्यांनी सरस कामगिरी केल्यामुळे तो 47 हजार 295 गुणांसह एकोणीसावा झाला आहे. बी. साई प्रणीत 48 हजार 360 मानांकन गुणांसह सतरावा आहे, तर अजय जयराम 45 हजार 835 मानांकन गुणांसह विसावा आहे. समीर वर्माची प्रगती कायम आहे. त्यानेच या क्रमवारीत भारतीयात सर्वोत्तम प्रगती केली आहे. त्याने चार क्रमांकाने प्रगती केली आहे. तो आता 21 वा आहे. त्याचे मानांकन गुण 44 हजार 642 आहेत. समीरने जपान स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली होती. 

सिंधू पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर 
पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत पुन्हा जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवले आहे. तिचे मानांकन गुण 81 हजार 106 आहेत. आघाडीवरील तई झु यिंग हिला मागे टाकणे सिंधूला नजीकच्या कालावधीत तरी अशक्‍य दिसत आहे. तईचे मानांकन गुण 94 हजार 409 आहेत. साईना अजूनही टॉप टेनबाहेर आहे. ती बाराव्या स्थानावर कायम आहे. 

प्रणव जेरी चोप्रा - एन सिक्की रेड्डी मिश्र दुहेरीत 19 व्या क्रमांकावर आहेत, हीच भारतीयांची सर्वोत्तम कामगिरी आहे. महिला दुहेरीत अश्वीनी पोनप्पा - एन सिक्की रेड्डी या 23 व्या क्रमांकावर आहेत. ते सोडल्यास दुहेरीत भारताचे कोणीही अव्वल 25 मध्ये नाही.