राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये : राज्यवर्धन राठोड

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

जवाहरलाल नेहरू स्टेडियम आम्ही योग्य वेळेत स्पर्धेसाठी फिफाकडे सुपूर्द केले आहे. ते स्टेडियमवर समाधानी आहेत. सर्वच ठिकाणची तिकीट विक्री चांगली होत आहे. या स्पर्धेचा आनंद मुलांनी घ्यावा, यासाठी आम्ही काही तिकिटांची विक्री राखून ठेवली होती. आता आमचा तोच प्रयत्न आहे. 
- राज्यवर्धन राठोड, केंद्रीय क्रीडामंत्री

नवी दिल्ली : राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये, तर राष्ट्रीय महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा जानेवारीत होतील, अशी घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केली. विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाच्या कौतुक कार्यक्रमात राठोड यांनी ही घोषणा केली. 

युवकांना खेळातील प्रगतीची संधी देण्याची गरज आहे. खेळाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा. भारतीय खेळाने नवी उंची गाठण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. तरुणांनी खेळात प्रगती करावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच सरकारने डिसेंबरमध्ये खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे, तर जानेवारीत राष्ट्रीय महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा होतील. गुणवत्ता हेरण्यासाठी या स्पर्धा घेत आहोत. या स्पर्धा दर वर्षी होतील. त्यातूनच आपल्याला खरी गुणवत्ता गवसणार आहे, असे राठोड यांनी सांगितले. 

या स्पर्धेच्या योजनांबद्दल ते म्हणाले, या स्पर्धा आशियाई अथवा पॅन अमेरिकन क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर घेण्यात येतील. या स्पर्धेतून निवडण्यात येणाऱ्या एक हजार क्रीडापटूंना आठ वर्षे पाच लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, असे राठोड यांनी सांगितले. या स्पर्धेत कॉर्पोरेटचा सहभाग असेल; तसेच त्याचे थेट प्रक्षेपणही होईल, असेही त्यांनी सांगितले. 

संधी लाभली आहे, अविस्मरणीय कामगिरी करा 
विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणारा भारतीय संघ आपल्या कामगिरीने देशास प्रेरित करू शकेल. त्यांचा खेळ सर्वांच्या कायम लक्षात राहील. भारतीय संघ यजमान असल्यामुळे पात्र ठरला असेल; पण विजय मिळवून अन्य संघांना तुम्ही धक्का देऊ शकाल, असे राठोड यांनी सांगितले. राठोड खेळाडूंना उद्देशून म्हणाले, ''प्रत्येक लढत ही आपली अखेरचीच लढत असे समजून खेळ करायला हवा. कधीही हार मानू नका. जिंकण्यासाठीच मैदानात उतरा. त्यासाठीच खेळ करा. कायम आक्रमक राहा, यशासाठीच सातत्याने लढत राहा. या संघात येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेले आहात. तो प्रवास आठवलात की, तुम्हाला प्रेरणा मिळेल. मैदानात उतराल, त्या वेळी तुम्हाला उद्देशून केलेली सर्वांत वाईट टिप्पणी आठवा. त्याने तुम्हाला त्रास झाला असेल. संघात येण्यासाठी यातना झाल्या असतील. आपली क्षमता दाखवण्यासाठी तुम्ही रात्रभर प्रयत्न केले असतील. आता तुम्ही बंगाल, मणिपूर किंवा गोव्यासाठी खेळत नाही, तर भारतासाठी खेळत आहात, हे सर्व मनात आणून खेळ करा. या स्पर्धेसाठी शुभेच्छा.''