उपांत्य फेरीसह साईनाचेही ब्रॉंझ नक्की 

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

शुक्रवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साईनानेही उपांत्य फेरीत धडक मारली. यामुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन पदके मिळतील. 

साईनाने यजमान देशाच्या कर्स्टी गिल्मोर हिला उपांत्यपूर्व फेरीत तीन गेममध्ये हरविले. 

शुक्रवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री साईनानेही उपांत्य फेरीत धडक मारली. यामुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन पदके मिळतील. 

साईनाने यजमान देशाच्या कर्स्टी गिल्मोर हिला उपांत्यपूर्व फेरीत तीन गेममध्ये हरविले. 

रिओ ऑलिंपिकविषयी खंत 
दरम्यान, साईनाने रिओ ऑलिंपिकविषयी खंत व्यक्त केली. तेव्हा गंभीर दुखापत झाल्याची कल्पना नव्हती, मी रिओला जायला नको होते, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. साईनाला दुसऱ्याच फेरीत युक्रेनच्या मारिया उलीटीना हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता. पदकाचे मुख्य आशास्थान अशी गणना झालेल्या साईनाचा पराभव भारतीय पथकासाठी निराशाजनक ठरला होता. पुनरागमनाविषयी साईना म्हणाली, की मी कोणत्या परिस्थितीला सामोरे गेले याची केवळ मलाच कल्पना आहे. पालकांचा विश्वास आणि प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळेच मी कोर्टवर पुन्हा पाऊल टाकू शकले. माझ्या उजव्या गुडघ्याला अजूनही वेदना होतात. 

साईनाला ऑलिंपिकनंतर गुडघ्यावरील शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर तिने अशक्‍यप्राय पुनरागमन केले. तिने या स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी तिने जाकार्तामधील स्पर्धेत रौप्य पदक मिळविले होते. 16व्या क्रमांकावर घसरलेल्या साईनाला 31व्या क्रमांकावरील कर्स्टीने झुंजविले; पण तिने निर्णायक गेममध्ये सरस खेळ केला. 

शर्थीची झुंज 
साईनाला विजयासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. ती म्हणाली, की लढत अटीतटीची होईल याची कल्पना होती; पण कर्स्टीचा इतका वेगवान खेळ पाहून मी चकित झाले. ती प्रेरित झाली होती आणि जिद्दीने खेळत होती. अनेक रॅली कठीण होत्या. तिसऱ्या गेममध्ये ती इतकी झुंज देईल असे वाटले नव्हते. 

कर्स्टीविरुद्ध साईनाने याआधीच्या चारही लढती जिंकल्या होत्या. तीन वर्षांनंतर ती प्रथमच कर्स्टीविरुद्ध खेळत होती. दरम्यानच्या काळात कर्स्टीने युरोपीय स्पर्धेत दोन रौप्यपदके मिळविली होती.

जागतिक स्पर्धेचा ड्रॉ माझ्यासाठी खडतर होता. मला पदकाची खात्री नव्हती. अशावेळी उपांत्य फेरी गाठल्याने फार आनंद वाटतो. 
- साईना नेहवाल 

निकाल 
साईना नेहवाल विवि कर्स्टी गिल्मोर 

21-19, 18-21, 21-15