भविष्यातील कामगिरी उंचावण्यासाठी बोल्ट ऍकेडमीचा फायदाच-ताई बाम्हणे 

residenational photo
residenational photo

नाशिक : आंतरराष्ट्रीयस्तरावर एकापेक्षा एक सरस आणि रेकॉर्ड ब्रेक करणारे धावपटू घडविणारी जमैकाची जगप्रसिध्द धावपटू उसेन बोल्ट यांची ऍकेडमी म्हणजे खेळाडू निर्मितीची खाणच आहे. खेळातील नवनवीन तंत्रशुध्द पध्दतीद्वारे प्रशिक्षण देण्याबरोबरच अंगमेहनत,भरपूर सरावाला तेथे प्राधान्य दिले जाते. त्यामुळे खेळाडू हा कायमच तंदूरूस्त राहतो आणि कुठल्याही आव्हानाला तो समर्थपणे तोंड देऊ शकतो असे नाशिकची धावपटू ताई बाम्हणे हिने "सकाळ'शी बोलतांना सांगितले. या ऍकेडमीत महिनाभर घेतलेल्या प्रशिक्षणाचा भविष्यातील कामगिरी उंचावण्यासाठी निश्‍चितच खूप उपयोग होईल असेही तिने नमूद केले. 
जमैकाच्या उसेन बोल्ट ऍकेडमीसाठी भारतातून 15 धावपटूंची निवड झाली होती. त्यात महाराष्ट्राच्या ताई बाम्हणे(नाशिक) सह सानिका नाटे,आदिती परब(दोघी मुंबई) यांचा समावेश होता. या धावपटू एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन नुकत्याच भारतात परत आल्या आहेत. तेथील प्रशिक्षणासह आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. ताई बाम्हणे म्हणाली,एनवायसीएस व गेल रफ्तारतर्फे झालेल्या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आमची जमैका प्रशिक्षणासाठी निवड झाली. उसेन बोल्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण म्हणजे आम्हाला एक सुवर्णसंधीच होती. जमैकाच्या वातावरणाशी जुळवून घेतांना आम्हाला बराच त्रास सहन करावा लागला पण आम्ही डगमगलो नाही. आमच्या क्रीडाप्रकारानुसार दररोज आठ ते दहा तासाहुन अधिक वेळ आमचे प्रशिक्षण चालत असे. भारतात कधीही न पाहिलेले किंबहुना आपल्याकडे प्रशिक्षणासाठी त्याचा फारसा वापर होत नसलेल्या स्प्रिंटवर प्रशिक्षण दिले गेले. त्यात धावतांना गती राखणे,आपला दम कमी जास्त होऊ न देता श्‍वास रोखून धरणे यासारख्या मुद्यांना प्राधान्य देण्यात आले. 
स्पर्धेकाला मागे टाकणे नव्हे वेळ नोंदवणे महत्वाचे 
ताई,सानिका म्हणाल्या,आपल्याकडे स्पर्धा,शर्यत म्हणजे दुसऱ्या स्पर्धेकाला मागे टाकून पुढे जाणे आणि त्याला पराभूत करणे एवढ्याच पुरती मर्यादित आहे.पण जमैकामध्ये शर्यत,स्पर्धेत केवळ स्पर्धेकाला मागे टाकणे म्हणजे स्पर्धा नव्हे तर वेळेशी तेथे खरा मुकाबला असतो. कमीत कमी वेळेत अंतर पार करून विक्रम प्रस्थापित करणे याला प्राधान्य दिले जाते. आपणच अगोदर नोंदवलेली वेळ मागे टाकत नवीन कमी वेळ नोंदवायला तेथील धावपटू महत्व देतात. त्यामुळेच वेळ नोंदवण्याच्या आणि स्पर्धा जिंकण्याच्या बाबतीत केनिया,जमैकाचे धावपटू आघाडीवर दिसतात. हेच तंत्रशुध्द प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. त्यासाठी तिथल्या धावपटूंबरोबर आमची स्पर्धाही झाली. 

बोल्टकडून प्रशिक्षणाचे धडे 
ताई,आदिती म्हणाल्या, धावपटू उसेन बोल्ट यांनी ऍकेडमीत आम्हाला पुरेसा वेळ दिला. धावण्याबरोबरच स्प्रिंटर,वॉटर रनिंग,डोंगरदऱ्याच्या ठिकाणी धावणे,हॉर्स रायडिंग,बक्षिस आणि विक्रमांसाठी वेळ नोंदवतांना घ्यावयाची काळजी यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवर मार्गदर्शन केले. काही तंत्रशुध्द प्रशिक्षणाचा मंत्रही सांगितला ज्याचा आम्हाला 2020 मध्ये टोकियो येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा व त्यादृष्टीने कामगिरी उंचावण्यासाठी उपयोग होऊ शकतो. 

अजमावण्यासाठी स्थानिक स्पर्धेत सहभाग 
एक महिन्यांत 100,200,400,800 मिटर धावणेसह इतर वेगवेगळ्या प्रकारांचे प्रशिक्षण दिले, दोन टप्प्यात प्रशिक्षण सराव सुरु ठेवण्याबरोबरच आहार,व्यायामाबाबतही काही तंत्रशुध्द धडे दिले. स्वतःला अजमावण्यासाठी हे धावपटू जमैकाच्या स्थानिक स्पर्धेत सहभागी झाले आणि आपल्या कामगिरीची छाप पाडत विजेतेही झाले. या कामगिरीचे बोल्ट ऍकेडमीच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com