फॉर्म्युला वन जगज्जेता रॉस्बर्गची ‘एक्‍झिट’

Nico Rosberg
Nico Rosberg

व्हिएन्ना - जर्मनीचा नवा फॉर्म्युला वन विश्‍वविजेता निको रॉस्बर्ग याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वार्षिक सोहळ्यात त्याने पत्रकार परिषदेत ही घोषणा करताच रेसिंग जगतात आश्‍चर्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जगज्जेता बनल्यानंतर त्याने पाच दिवसांत हा निर्णय घेतला.

रॉस्बर्गने मर्सिडीज संघातील सहकारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी लुईस हॅमिल्टन याच्यापेक्षा सरस कामगिरी करत पहिलेवहिले जगज्जेतेपद मिळविले. यंदा जागतिक फॉर्म्युला वन मालिकेत अखेरच्या शर्यतीपर्यंत रंगत कायम राहिली. त्यात रॉस्बर्गची पाच गुणांनी सरशी झाली. 

रॉस्बर्ग म्हणाला, की  ‘रेसिंगमधील २५ वर्षांच्या कारकिर्दीत माझे एकच स्वप्न होते आणि ते म्हणजे फॉर्म्युला वन विश्‍वविजेता बनण्याचे. त्यासाठी कसून सराव केला, त्याग केला. मी हे स्वप्न साकार केले.’ रॉस्बर्गने २००६ मध्ये बहारीन ग्रांप्रीमध्ये विल्यम्स संघाकडून पदार्पण केले. त्याने सातवा क्रमांक मिळविला होता. 

वडिलांचा वारसा 
निको हा फिनलंडचे विश्‍वविजेते केकी यांचा मुलगा आहे. केकी यांनी १९८२ मध्ये विल्यम्स संघाकडून विजेतेपद मिळविले होते.

संघाला आश्‍चर्य
मर्सिडीज संघाचे प्रमुख टोटो वोल्फ यांनी या निर्णयाविषयी आश्‍चर्य व्यक्त केले. ‘आम्हाला आता पर्यायांचा विचार करावा लागेल. सोमवारपासून आम्ही त्यासाठी प्रयत्न करू,’ असे त्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात कारकीर्द 
निको रॉस्बर्ग  : देश ः जर्मनी, वय ः ३१ 
 फिनलंडचे केकी आणि जर्मनीच्या सीना यांचा मुलगा
 वडिलांनी १९८५ची डेट्रॉइटमधील ‘यूएसए-ईस्ट ग्रांप्री’ जिंकल्यानंतर चार दिवसांनी जन्म  लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा प्रवेश टाळून रेसिंगमध्ये कारकीर्द   २००५ मध्ये ‘जीपी २’ विजेता  २०१० मध्ये ब्रॉन जीपी संघात मायकेल शूमाकरचा सहकारी. शूमाकरचे ७२, तर रॉस्बर्गचे १४२ गुण
 यंदाच्या मोसमात २१ पैकी नऊ शर्यतींत विजय
 २०१३ मध्ये वडिलांप्रमाणेच मोनॅको ग्रांप्रीमध्ये २० वर्षांनी विजय
 ग्रॅहॅम-डॅमन या हिल पिता-पुत्रांच्या जोडीनंतर केकी-निको ही फॉर्म्युला वन जगज्जेत्यांची दुसरीच जोडी
 निकोचा कारकिर्दीत २०६ शर्यतींत सहभाग, २३ विजय

माझ्या खेळातील शिखर मी सर केले आहे. आता मी सर्वोच्च ठिकाणी आहे. त्यामुळे निवृत्तीची हीच वेळ योग्य वाटते. या घडीला माझे मन कृतज्ञतेने भारले आहे. माझे स्वप्न साकार करण्यासाठी पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे.
- निको रॉस्बर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com