मुंबई मॅरेथॉन: खोदकाम, मेट्रोचा अडथळा येणार नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई- मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा मुंबई मॅरेथॉनच्या संयोजनावर थेट परिणाम होणार नाही; मात्र केवळ या ठिकाणी शर्यत येताना गर्दी नसेल, याचाच आधार संयोजक घेत आहेत.

मुंबई- मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा मुंबई मॅरेथॉनच्या संयोजनावर थेट परिणाम होणार नाही; मात्र केवळ या ठिकाणी शर्यत येताना गर्दी नसेल, याचाच आधार संयोजक घेत आहेत.

मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर आझाद मैदान, हिंदुजा, तसेच सिद्धिविनायक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. आझाद मैदानात मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. याच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रिफ्रेशमेंटपासून सर्व सुविधा असतात; मात्र उपलब्ध जागेत आम्ही सर्व काही तयार केले आहे, असे मुंबई मॅरेथॉनचे प्रवर्तक असलेल्या "प्रोकॅम'चे विवेक सिंग यांनी सांगितले; मात्र सुविधा कोठेही कमी पडणार नाहीत किंवा गर्दीही जास्त होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. काही गेट बदलले आहेत, असे सांगतानाच त्यांनी बुजुर्गांच्या शर्यतीच्या मार्गात बदल केला नसला, तरी त्यांच्या व्यवस्थेत काही प्रमाणात बदल केला असल्याचे सांगितले.

हिंदुजा, तसेच सिद्धिविनायक येथेही मेट्रोचे काम सुरू झाले आहे. तेथील रस्ता लहान झाला असला, तरी या टप्प्यात येईपर्यंत स्पर्धकांची गर्दी कमी झालेली असते. हेच अखेरच्या काही मीटरमध्ये जरी काम सुरू असले, तरी त्या वेळी स्पर्धकांचा जथा नसतो. त्यामुळे कोणताही प्रश्‍न निर्माण होणार नाही, असे रेस डायरेक्‍टर ह्युज जोन्स यांनी सांगितले.

दुर्घटनामुक्त शर्यतीची ग्वाही
दोन वर्षे मॅरेथॉनमध्ये कोणतीही कटू घटना घडलेली नाही. यंदाही काही घडणार नाही. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात स्पर्धकांवर जास्त लक्ष दिल्यास हे टाळता येते, हे आमच्या लक्षात आले आहे, असे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. नीलेश गौतम यांनी सांगितले. त्यांना वातावरण थंड असल्यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होणार नसल्याचेही सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून 60 स्वयंसेवकांनाही प्राथमिक मार्गदर्शन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.