‘आयओए’ची अखेर ‘विकेट’

‘आयओए’ची अखेर ‘विकेट’

क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय ऑलिंपिक संघटना बरखास्त

नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर अखेर भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) बरखास्त करण्याची वेळ आली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त संघटक सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची अजीव अध्यक्षपदांवरील नियुक्ती रद्द करीत नाही तोपर्यंत ही कारवाई कायम राहील, असे बजावण्यात आले.

या नियुक्तीबद्दल मंत्रालयाने ‘आयओए’ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास उत्तर देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत होती; पण उत्तर देणार नसल्याचे ‘आयओए’ने गुरुवारीच स्पष्ट केले होते. शुक्रवारी मात्र ‘आयओए’ने एक पाऊल मागे टाकले. आमचे अध्यक्ष परदेशात आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची गरज आहे. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती करण्यात आली. ती मंत्रालयाने अमान्य केली. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या बरखास्तीमुळे सरकारने राष्ट्रीय ऑलिंपिक समिती (एनओसी) म्हणून बहाल केलेले हक्क आणि अधिकार ‘आयओए’ला वापरता येणार नाहीत. सरकारकडून दिले जाणारे आर्थिक किंवा इतर सर्व प्रकारचे साह्यसुद्धा थांबविले जाईल.

‘वेळकाढूपणाचा डाव’
विजय गोयल यांच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालयाने खंबीर भूमिका घेतली होती. मुदत वाढवून देण्याची विनंती फेटाळून लावताना मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘आम्ही ‘आयओए’च्या उत्तराविषयी अजिबात समाधानी नाही. मुख्यतः कलमाडी व चौटाला यांच्या नियुक्तीसंदर्भात त्यांनी कोणतेही थेट आणि अर्थपूर्ण उत्तर दिलेले नाही. त्यांचे उत्तर म्हणजे केवळ वेळकाढूपणाचा डाव आहे. उत्तम प्रशासनाच्या निकषांचा विचार केल्यास ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. ‘आयओए’ही क्रीडा संघटनांची शिखर संघटना आहे. हा देशाची प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावनेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे अयोग्य निर्णय मागे घेण्यासाठी तातडीने योग्य कृती होण्याची गरज आहे.

बात्रांचा राजीनामा
दरम्यान, कलमाडी आणि चौटाला यांच्या नियुक्तीबद्दल ‘आयओए’चा निषेध करीत हॉकी संघटक तसेच नरींदर बात्रा यांनी ‘सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की, कलमाडी आणि चौटाला यांनी ‘आयओए’मध्ये मागील दाराने प्रवेश करण्यास माझा तीव्र विरोध आहे. मी बऱ्याच सदस्यांकडून खातरजमा केली. तेव्हा बहुतेकांना सात दिवस अगोदर वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती मिळाली नसल्याचे लक्षात आले. कलमाडी यांनी हे पद नाकारल्याबद्दल बात्रा यांनी त्यांचे आभार मानले.
 

एका मिनिटांत मंजुरी...
‘आयओए’च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये जाहीर भूमिका घेणारे बात्रा हे एकमेव प्रमुख संघटक होते. त्यांनी संघटनेला पत्र धाडले होते. त्यांनी स्पष्ट केले की, या विशिष्ट नियुक्तींच्या वेळी उपस्थित असलेल्या सदस्यांकडून मला कळले की विषयपत्रिकेतच नसलेला हा विषय अखेरच्या क्षणी उपस्थित झाला आणि तो एका मिनिटांत चर्चेशिवाय मंजूर झाला. त्यानंतर लगेच वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

केंद्र सरकारला ऑलिंपिक संहितेविषयी परमोच्च आदर आहे. खेळाची स्वायत्तता अबाधित राखण्यास सरकार कटिबद्ध आहे, पण नैतिकता आणि उत्तम प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली करून ‘आयओए’ देशाच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेला धक्का देत असेल तर सरकार त्या परिस्थितीत मूक साक्षीदार बनणार नाही.
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निवेदनातील मजकूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com