ब्राझील संघाच्या सरावात नेमारचा सहभाग

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

स्टार स्ट्रायकर नेमार ब्राझील संघाच्या सरावात मंगळवारी सहभागी झाला. टेरेसपोलीस शहराच्या ग्रॅंडा कॉमारी येथील ट्रेनिंग बेसवर ब्राझीलचा संघ आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.
 

रिओ दी जानेरो - स्टार स्ट्रायकर नेमार ब्राझील संघाच्या सरावात मंगळवारी सहभागी झाला. टेरेसपोलीस शहराच्या ग्रॅंडा कॉमारी येथील ट्रेनिंग बेसवर ब्राझीलचा संघ आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.

पॅरीस सेंट-जर्मेनकडून खेळणाऱ्या नेमारने उत्स्फूर्तपणे सराव केला. फेब्रुवारी अखेरीस उजव्या पायाच्या करंगळीचे हाड मोडल्यानंतर नेमार स्पर्धात्मक फुटलपासून दूर आहे. तीन मार्च रोजी बेलो हॉरीझॉंटे शहरात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता तंदुरुस्त होण्याच्या मार्गातील अंतिम टप्प्यात तो आहे. 26 वर्षीय नेमारच्या वेगवेगळ्या नियमित वैद्यकीय चाचण्या झाल्या. त्यानंतर त्याने सुमारे तासभर चेंडू घेऊन सराव केला. येत्या काही दिवसांत त्याच्या सरावाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. संघाचे डॉक्‍टर रॉड्रीगो लॅस्मार यांनी सांगितले की, 17 जून रोजी स्वित्झर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यापर्यंत नेमारची तंदुरुस्ती सर्वोच्च पातळीवर असेल. 

ब्राझीलचे त्याआधी दोन मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय सामने होतील. तीन जून रोजी क्रोएशिया, तर दहा जून रोजी ऑस्ट्रीयाविरुद्ध ते खेळतील. 

Web Title: Neymar's participation in the Brazil side