विजेतेपदाच्या शर्यतीत नाही - रोनाल्डो 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

विश्‍वकरंडक स्पर्धेत पोर्तुगालने आपल्या संघाकडून फार आशा बाळगू नयेत, परिस्थितीचे भान ठेवावे, आपण विजेतेपदासाठी नक्कीच फेव्हरेट नाही, असे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सांगितले. 

लिस्बन - विश्‍वकरंडक स्पर्धेत पोर्तुगालने आपल्या संघाकडून फार आशा बाळगू नयेत, परिस्थितीचे भान ठेवावे, आपण विजेतेपदासाठी नक्कीच फेव्हरेट नाही, असे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने सांगितले. 

दोन वर्षांपूर्वी पोर्तुगालने युरो स्पर्धा जिंकत सर्वांना धक्का दिला होता. त्या यशात रोनाल्डोने मोलाची कामगिरी केली होती. तो आता पोर्तुगालच्या अल्जेरियाविरुद्धच्या सराव सामन्यात खेळण्याची शक्‍यता आहे. संघाला लिस्बनमध्ये उत्साहात स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्या वेळी रोनाल्डोने फार अपेक्षा बाळगू नका, असेच जणू आवाहन केले. 

आम्ही सर्वोत्तम कामगिरीचेच लक्ष्य ठेवले आहे, पण त्याच वेळी आम्ही स्पर्धेत फेव्हरेट नाही, याची आम्हाला जाणीव आहे. आम्हाला परिस्थितीचे नक्कीच भान आहे, पण फुटबॉलमध्ये काहीही अशक्‍य नाही. आम्ही एकावेळी एकाच लढतीचा विचार करणार आहोत. स्पर्धेतील सलामीची लढत सोपी नाही, पण आम्ही सर्वोत्तम खेळ करण्यास तयार आहोत, असे रोनाल्डोने सांगितले. 

तो म्हणाला, ""युरो स्पर्धेप्रमाणेच आम्ही अखेरपर्यंत लढणार आहोत. प्रत्येक लढत महत्त्वाची असेल. त्याचा स्वतंत्र विचार करणार आहोत. पोर्तुगालकडून खेळत असल्याचा संघातील प्रत्येकाला अभिमान आहे. देशाची शान वाढवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू. आमच्यावर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल मी तुमचा आभारी आहे.'' 

Web Title: not in champion race says ronaldo