जोकोविचसाठी आता अगासी सुपर कोच

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

आंद्रे अगासी यांच्याबद्दल व्यक्ती आणि खेळाडू म्हणून मला विलक्षण आदर आहे. मी जात आहे अशा प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीतून ते गेले आहेत. कोर्टवरील त्यांची खेळाची समज आश्‍चर्य वाटावे इतकी विलक्षण आहे. त्यांच्याशी होत असलेले प्रत्येक संभाषण आनंददायक ठरत आहे. - नोव्हाक जोकोविच

रोम - फॉर्मसाठी झगडत असलेला सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने आता सुपर कोच म्हणून कारकिर्दीत बरेच चढ-उतार पाहिलेले अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू आंद्रे अगासी यांची नियुक्ती केली आहे. आगामी फ्रेंच ओपनदरम्यान अगासी त्याला मार्गदर्शन करतील.

या महिन्याच्या प्रारंभी जोकोविचने संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलला. त्याने दीर्घकालीन प्रशिक्षक मरियन वाज्दा यांनाही काढले. त्यापूर्वी त्याने बोरीस बेकर यांच्याबरोबरील करार संपविला होता. आता त्याला दिग्गज खेळाडूच्या मार्गदर्शनाची गरज वाटू लागली आहे. इटालियन मास्टर्स स्पर्धेत जोकोविचला अंतिम फेरीत जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेवने हरविले.

जोकोविचने सांगितले की, गेले दोन आठवडे माझे आंद्रे यांच्याशी फोनवर संभाषण सुरू आहे. आम्ही पॅरिसमधील ग्रॅंड स्लॅम स्पर्धेसाठी एकत्र यायचे ठरविले. त्यानुसार ते येतील. भविष्यात काय घडते ते आम्ही पाहू. ही भागीदारी सुरू करण्यासाठी आम्ही दोघे आतुर आहोत. आम्ही दीर्घ काळासाठी काही ठरविलेले नाही. पॅरिसमध्ये आम्ही एकमेकांचे स्वभाव, कार्यपद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आंद्रे संपूर्ण स्पर्धेसाठी नसतील ते काही काळासाठीच असतील.

अगासी ४७ वर्षांचे आहेत. ते २००६ मध्ये निवृत्त झाले. कारकिर्दीत त्यांनी आठ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविली. अगासी यांच्याविषयी जोकोविच म्हणाला की, आंद्रे कुटुंबवत्सल आहेत. ते लोककल्याणासाठी कार्य करतात. ते अत्यंत विनम्र आणि विद्वान आहेत. कोर्टवर आणि कोर्टबाहेर माझ्या जीवनात योगदान देऊ शकेल अशी ती व्यक्ती आहे.