पाक स्क्‍वॅश संघटनेचा कांगावा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

आम्ही व्हिसाच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी गेल्या शुक्रवारी सांगितले होते; परंतु सोमवारपर्यंत पुढील घडामोडीची काहीच माहिती पाक संघटनेकडून देण्यात आली नव्हती. आता खूप उशीर झाला आहे. 
- सायरस पोंचा, स्पर्धा संचालक 
 

कराची - यजमान भारताने जाणीवपूर्वक व्हिसा नाकारल्याचा कांगावा पाकिस्तानने केला असून, या संदर्भात जागतिक आणि आशियाई स्क्वॉश संघटनांकडे तक्रार केली आहे. आशियाई स्क्‍वॉश स्पर्धा आजपासून चेन्नईत सुरू झाली. 

आम्ही या स्पर्धेत गतविजेते आहोत, आमच्या खेळाडूंना व्हिसा देण्यात भारताने जाणीवपूर्वक वेळ काढला. भारताचा हा प्रकार आम्ही जागतिक संघटनेच्या लक्षात आणून दिला आहे, व्हिसा प्रक्रियेसाठी आम्ही 17 मार्च रोजीच अर्ज दाखल केले असल्याचे पाकिस्तान स्क्वॉश संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

फरहान मेहबूब, फरहान झमान, तय्यब अस्लम आणि वकार मेहबूब असे चार खेळाडू या स्पर्धेत खेळणार होते. आमच्या या चारही खेळाडूंना त्यांचे पासपोर्ट पुन्हा दाखल करण्यास भारतीय दूतावासाने सोमवारी सांगितले होते, असे सांगून पाकिस्तान स्क्वॉश संघटनेचे सचिव ताहिल सुलतान आरोप करताना म्हणतात, 17 मार्चला दाखल केलेले पासपोर्ट परत दिले आणि सोमवारी पुन्हा सादर करण्यास सांगितले. भारतीय दूतावासाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे लक्षात येताच आम्ही पुन्हा अर्ज न करण्याचा निर्णय घेतला. 

खेळात राजकारण केले जाऊ नये, असे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत; मात्र भारताचे नेहमीच स्वतंत्र धोरण राहिले आहे. परंतु, व्हिसा देण्यास टाळाटाळ करणे न पटणारे आहे. ही स्पर्धा आशिया विभागाची आहे; भारताची नाही, असाही कांगावा सुलतान यांनी केला आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारण्याचा हा मुद्दा राजनैतिक स्तरावर नेण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा दिला जात नाही, असेही आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहेत. असा प्रकार आता नित्याचा होत असल्यामुळे आमच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, असेही सुलतान म्हणाले. डिसेंबर महिन्यात भारतात झालेल्या ज्युनियर विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेसाठीही व्हिसा नाकारल्याचा दाखला त्यांनी दिला. 

आम्ही व्हिसाच्या प्रतीक्षेत आहोत, असे त्यांनी गेल्या शुक्रवारी सांगितले होते; परंतु सोमवारपर्यंत पुढील घडामोडीची काहीच माहिती पाक संघटनेकडून देण्यात आली नव्हती. आता खूप उशीर झाला आहे. 
- सायरस पोंचा, स्पर्धा संचालक