पाकिस्तानी कबड्डीपटूंचा लिलावात विचारही नाही

पाकिस्तानी कबड्डीपटूंचा लिलावात विचारही नाही

नवी दिल्ली - नवी झेप घेण्यास सज्ज होत असलेल्या प्रो कबड्डीच्या लिलावासाठी भले १० पाकिस्तानी खेळाडूंचा यादीत समावेश केला असेल आणि सरकारच्या परवानगीवर त्यांचा सहभाग अवलंबून असेल, असे सांगण्यात आले असले, तरी एकाही संघमालकाने पाक खेळाडूंचा विचारही केला नाही.

चार नव्या संघांसह क्रांती घडवण्यास सज्ज होत असलेल्या प्रो कबड्डीसाठी खेळाडूंवर लाखांची लयलूट करणारा लिलाव आजपासून दिल्लीत सुरू झाला. पाकिस्तानी खेळाडूंना पुन्हा एकदा नो एंट्री दाखवणाऱ्या या लिलावात परदेशी खेळाडूंमध्ये इराणच्या खेळाडूंनी चांगलाच भाव खाल्ला.

...म्हणून लिलावात पाक खेळाडू
लिलावासाठी तयार करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये १० पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. याबाबत खुलासा करताना ‘मशाल स्पोर्टस्‌’चे चारू शर्मा यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय आणि आशियाई कबड्डी महासंघाच्या नियमाप्रमाणे आम्हाला सर्वोत्तम खेळाडू उपलब्ध करणे भाग आहे. त्यानुसार पाक खेळाडूंचा यादीत समावेश केला. संघात निवडायचे की नाही याचे अधिकार संघमालकांना आहेत. जर त्यांनी निवड केली, तर आम्ही व्हिसासाठी प्रयत्न करू. शेवटी आम्ही सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही.

क्रीडामंत्री नकारावर ठाम
दरम्यान, लिलाव सुरू होण्यापूर्वीच क्रीडामंत्री विजय गोयल   पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश न करण्यावर ठाम होते. जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत पाक खेळाडूंना भारतात खेळायला परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. 

प्रो कबड्डी संघटकांनी भले त्यांना बोलवावे; पण आम्ही त्यांना खेळू देणार नाही. त्यांची निवड केली तरी आम्ही त्यांना भारतात येण्याची परवागी देणार नाही, असे गोयल म्हणाले. गोयल यांच्या या ठाम भूमिकेनंतर संघमालकांनी पाक खेळाडूंसाठी बोली लावण्याचा विचारही केला नाही.

इराणी जोशात
काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील विश्वकरंडक स्पर्धेत भारताला झुंजवल्यानंतर इराणी खेळाडूंची मागणी वाढणार हे उघड होते. फझल अत्राचली याला गुजरातने आपल्या संघात लिलावापूर्वीच घेतले. नव्या चार संघांना त्यांच्या पसंतीचा एकेक खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली होती. प्रत्यक्ष बोलीमध्ये इराणच्या अबोझर मोहजेरमिघानी याला तब्बल ५० लाख मिळाले. ‘यू मुम्बा’बरोबर स्पर्धा केल्यानंतर गुजरातने त्याला आपल्या संघात घेतले. त्यानंतर अबोफझल मघासोल्दो याला ३१ लाख ८० हजार मिळाले. 

गेल्या प्रो कबड्डीत कोपरारक्षक म्हणून पाटण्याच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या हादी आसत्रोक याला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता होती; परंतु ‘यू मुम्बा’ने त्याला १८ लाखांना घेतले. या परदेशी खेळाडूंसाठी १२ लाखांची मूलभूत रक्कम ठेवण्यात आली होती. 

नितीन तोमरला ९३ लाख
भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक भाव नितीन तोमरला मिळाला. उत्तर प्रदेशने त्याला तब्बल ९३ लाखांना घेतले. रोहित कुमारला बंगळुरूने ८१ लाखांना विकत घेतले. गतवेळेस सर्वाधिक ५३ लाख मिळालेल्या मोहित चिल्लरवर या वेळी ४६ लाख ५० हजारांचाच भाव मिळाला. 

प्रमुख एलिट भारतीय खेळाडू
संदीप नरवाल (पुणे) ६६ लाख, कुलदीप सिंग (मुंबई) ५१ लाख ५० हजार, मनजित चिल्लर (जयपूर) ७५ लाख ५० हजार, राजेश नरवाल (उत्तर प्रदेश) ६९ लाख, रण सिंग (बेंगळुरू) ४७ लाख ५० हजार, राकेश कुमार (तेलगू टायटन्स) ४५ लाख, विशाल माने (पाटणा) ३६ लाख ५० हजार, अनिल कुमार (तमिळनाडू) २५ लाख ५० हजार, सचिन शिंगाडे (पाटणा) ४२ लाख ५० हजार, अमित हुडा (तमिळनाडू) ६३ लाख, सुरजित सिंग (बंगाल) ७३ लाख २० हजार, गिरीश इरनाक (पुणे) ३३ लाख ५० हजार, रवींद्र पहाल (बेंगळुरू) ५० लाख, जोगिंदरसिंग नरवाल (यू मुम्बा) ३२ लाख, चेर्लाथन (पुणे) ४६ लाख, नीलेश शिंदे (दिल्ली) ३५ लाख ५० हजार, जीवा कुमार (उत्तर प्रदेश) ५२ लाख, मोहित चिल्लर (हरियाना) ४६ लाख ५० हजार, रोहित राणा (तेलगू) २७ लाख ५० हजार, सोनू नरवाल (हरियाना) २१ लाख, जसवीर सिंग (जयपूर) ५१ लाख, मोनू गोयत (पाटणा) ४४ लाख ५० हजार, काशिलिंग आडके (मुंबई) ४८ लाख, नितीन मदने (मुंबई) २८ लाख ५० हजार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com