प्रशिक्षकपदाचाही आनंद घेतोय : मनप्रीत 

Manpreet Singh
Manpreet Singh

पुणे : खेळाडू म्हणून कबड्डीचा आनंद खूप घेतला, यशही मिळविले आणि आता प्रशिक्षकपदाचाही आनंद घेतोय, अशी प्रतिक्रिया मनप्रीतसिंग यांनी व्यक्त केली. मनप्रीत प्रो-कबड्डीच्या पाचव्या मोसमात गुजरात संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहेत. पालक आणि मुले यांच्यात जसा संवाद असतो, तसाच संवाद असल्यामुळे संघ यश मिळवत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मनप्रीत यांचे प्रशिक्षक म्हणून आणि संघ म्हणून गुजरातचे या स्पर्धेत पदार्पण झाले. दोघांनीही सातत्यपूर्ण कामगिरी दाखवून कमालीचे यश मिळविले. याच गुजरातला संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीत पहिली पसंती मिळत आहे. संघाच्या या एकूणच प्रवासाविषयी मनप्रीत यांच्याशी झालेला मुद्देसूद संवाद ः 

प्रशिक्षक बनण्याविषयी... 
कबड्डीपटू म्हणून खेळायची इच्छा निश्‍चित होती. वय आणि बरोबरीने वजनही वाढले होते. यश खूप मिळविले होते. त्यामुळे कधीतरी थांबायचेच होते. पण, मनात भिनलेली कबड्डी स्वस्थ बसू देत नव्हती. वजन 120 किलोच्या आसपास होते. ते कमी करून खेळू शकत होतो. पण, ते कायम राखणे शक्‍य नव्हते. त्यामुळे प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घेतला. कबड्डीपटू म्हणून खेळाचा आनंद घेतला आणि दिला. आता प्रशिक्षक बनल्यानंतरही या नव्या जबबाबदारीबरोबर खेळाचाही आनंद तेवढाच घेतोय. प्रशिक्षक बनताना खेळाडूंचे पालक बनून त्यांच्याशी संवाद ठेवण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांना घडवणे सोपे गेले. संघात अनुभवी खेळाडू असले, तरी युवा जास्त होते. अर्थात नवा-जुना असा फरक कधीच केला नाही. सर्वांना एकाच पट्टीत मोजून मार्गदर्शन केले. खेळाडूंनीही साथ दिली. त्याची पावती मिळत आहे. 

सुकेशने शब्द पाळला 
सुकेश हेगडे गुजरातचा प्रमुख खेळाडू होता. लीगचा अनुभवदेखील त्याच्या गाठीशी होता. पण, कर्णधार झाल्यावर त्याच्यावर दडपण आले. तो मोकळेपणाने खेळू शकत नव्हता. त्यामुळे पाचव्या मोसमात अपयश त्याच्या पाठी लागले होते. अशा वेळी एक दिवस त्याला त्याच्यातील सर्वोत्तम खेळाची आठवण करून दिली. तो निराशेतून कसा बाहेर येईल हे पाहिले. त्या वेळी अखेरच्या टप्प्यात तुम्हाला जुना सुकेश दिसून येईल असा शब्द त्याने दिला. वीस गुणही मिळवून दाखवेन, असे सांगितले. त्याने शब्द पाळला. पुणे संघाविरुद्ध खेळताना आपल्या जुन्या खेळाची आठवण करून दिली. खेळाडूंनी अशी साथ दिल्यावर प्रशिक्षकाला आणखी काय हवे असते. खेळाडूंची कामगिरी आणि विश्‍वास हीच त्याच्या कामगिरीची पावती असते. 

इराणच्या आव्हानाविषयी... 
नक्कीच, आंतरराष्ट्रीय स्तरावर आता इराणचे आव्हान अधिक तगडे होत आहे. "प्रो'च्या माध्यमातून त्यांचे अनेक खेळाडू अनुभवी होत आहेत, यात शंकाच नाही. पण, भारताला कबड्डीत अजून तरी तोड नाही हे अन्य देशही जाणून आहेत. आपल्याकडे खेळ रुजला आहे. परदेशात हा खेळ हळूहळू फोफावत आहे. इराण, जपान, कोरिया, पाकिस्तान अशी काही देशांची नावे घेता येतील. परदेशी खेळाडूंचे आव्हान त्यातही इराणचे आव्हान कठीण दिसत असले, तरी आपल्याला ते परतवणे अशक्‍य नाही. शेवटी खेळात आव्हान असणे केव्हाही चांगले. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला आपला खेळ उंचावण्याची प्रेरणा मिळते. 

पाचवा मोसम प्रदीर्घ वाटत असला, तरी त्याचा परिणाम खेळाडूंवर होतोय असे वाटत नाही. एक सामना झाला की पुरेशी विश्रांती मिळत असल्यामुळे खेळाडूंना त्रास जाणवत नाही. यामुळे कबड्डी अधिक खेळायला मिळाली. तंदुरुस्ती हा एक भाग झाला. खेळ आणि खेळाडूंच्या कारकिर्दीचा हा एक भागच आहे. त्यामुळे खेळाडूंनी काळजी घ्यायला हवी. तितके आता ते परिपक्व झाले आहेत. 
- मनप्रीतसिंग, गुजरातचे प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com