स्कूलिंपिक्‍स : पुण्यात रविवारी मिनी-मॅरेथॉन

स्कूलिंपिक्‍स : पुण्यात रविवारी मिनी-मॅरेथॉन

पुणे : जिल्हास्तरावर आपले क्रीडानैपुण्य पणाला लावणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धेच्या बरोबरीने हक्काचे मैदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘सकाळ स्कूलिंपिक्‍स २०१७’ स्पर्धांना रविवार पासून (ता. १२) सुरवात होत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राचे भविष्य ठरू शकणाऱ्या शालेय क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या ‘सकाळ स्कूलिंपिक्‍स’चा प्रारंभ ‘रन फॉर द रायझिंग स्टार्स’ या मिनी-मॅरेथॉनने होत आहे.

रविवारी सकाळी ६.३० वाजता सारसबागेजवळील बाबूराव सणस मैदानावरून या मिनी-मॅरेथॉनला सुरवात होणार आहे.  

देशातील या सर्वांत मोठ्या आंतरशालेय स्पर्धेत यावर्षी २१ क्रीडा प्रकारांमध्ये ६९२ सुवर्णपदकांसह एकूण २२२५ पदके जिंकण्याची संधी शालेय क्रीडापटूंना मिळणार आहे. बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल अशा सात सांघिक खेळांसह बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, जिम्नॅस्टिक्‍स, ज्युडो, नेमबाजी आदी १४ वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. ‘स्कूलिंपिक्‍स’मध्ये यावर्षीही आधीच्या दोन हंगामांप्रमाणे चुरशीची स्पर्धा व सर्वोत्तम कामगिरीचा थरार विविध शाळांमधील क्रीडापटूकडून अनुभवायला मिळेल.

सांघिक गटातील स्पर्धा १६ वर्षांखालील मुले आणि मुलींकरिता असतील. वैयक्तिक क्रीडा प्रकारांसाठी वय वर्षे १० ते १२, १२ ते १४ आणि १४ ते १६ असे तीन वयोगट करण्यात आले आहेत.

मागील वर्षी (२०१६) ‘स्कूलिंपिक्‍स’मध्ये पुण्यातील ४१३ शाळांमधील सुमारे ३० हजारांहून अधिक क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला होता.  

सांघिक क्रीडा प्रकारांत बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या स्पर्धांचा समावेश असून, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, जिम्नॅस्टिक, ज्युदो, तायक्वांदो, ॲथलेटिक्‍स, स्केटिंग, स्विमिंग, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, नेमबाजी, धनुर्विद्या, बुद्धिबळ अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारातील स्पर्धांच्या ४००हून अधिक फेऱ्या होणार आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या स्पर्धांमध्ये स्पर्धकांना २ हजार २२५ पदके (६९२ सुवर्ण, ६९२ रौप्य आणि ८४१ ब्राँझपदके) पटकाविण्याची संधी आहे.

‘स्कूलिंपिक्‍स २०१७’ 

  • समाविष्ट क्रीडा प्रकार - २१ -सांघिक ७ आणि वैयक्तिक १४
  • १० ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना संधी
  • एकूण पदके : २२२५ - सुवर्ण ६९२, रजत ६९२ आणि कांस्य ८४१

सांघिक पारितोषिके

सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळेस 

  • पहिले पारितोषिक - करंडक आणि रु. ३ लाख
  • दुसरे पारितोषिक - करंडक आणि रु. २ लाख
  • तिसरे पारितोषिक - करंडक आणि रु. १ लाख
  • विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास आणि विद्यार्थिनीस विशेष पारितोषिक
  • गत विजेते (अनुक्रमे पहिले तीन क्रमांक) - अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम, सिंहगड स्प्रिंगडेल आंबेगाव, बॉईज स्पोर्ट्‌स स्कूल, बीईजी, खडकी
  • विशेष कामगिरी -सोहम गोसावी (बिशप स्कूल, कॅम्प) आणि युक्ता वखारिया (अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम)

या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क - ८७९३०१६००५, ८२३७२१८१००

‘रन फॉर द रायझिंग स्टार्स’ मिनी-मॅरेथॉनचा मार्ग:

बाबूराव सणस मैदानावरून सुरवात -थोरले माधवराव पेशवे रस्ता -लालबहादूर शास्त्री रस्ता - अलका चित्रपटगृह चौकातून - टिळक रस्त्यावरून बाबूराव सणस मैदानावर परत  -एकूण अंतर ४ कि.मी. मार्गावर चार ठिकाणी प्रथमोपचार, पाणी व अन्य मदतीची सोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com