सिंधूचा झटपट विजय; साईनाची मॅरेथॉन झुंज अपयशी

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

निकाल (पहिली फेरी) 
महिला एकेरी ः पी. व्ही. सिंधू विवि दिनार द्याह आयुस्तीने 21-8, 21-18 
साईना नेहवाल पराभूत वि. सायाका सातो 19-21, 21-16, 21-18 
पुरुष एकेरी ः अजय जयराम विवि तियान होऊवेई 21-18, 18-21, 21-19 
मिश्र दुहेरी ः प्रणव जेरी चोप्रा-एन. सिकी रेड्डी पराभूत वि. सिवेई झेंग-क्विंगचेन चेन 15-21, 21-14, 16-21 
 

वुहान (चीन) - भारताचा जिगरबाज बॅडमिंटनपटू अजय जयराम याने सरस प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्याची मालिका कायम राखली आहे. आशियाई स्पर्धेत त्याने पाचव्या मानांकित चीनच्या तियान होऊवेईला एक तास दहा मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत तीन गेममध्ये हरविले. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने विजयी सलामी दिली, पण साईना नेहवालला पराभवाचा धक्का बसला. 

जयरामने जागतिक क्रमवारीत 13व्या स्थानापर्यंत प्रगती केली आहे. सध्या तो भारताचा सर्वोत्तम क्रमांकाचा खेळाडू आहे. सातव्या क्रमांकावरील तियानविरुद्ध तिन्ही गेम चुरशीचे झाले. पहिला गेम जिंकून जयरामने मानसिक लढाई जिंकली. दुसऱ्या गेममध्ये तियानने अनुभव आणि दर्जाच्या जोरावर बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये जयरामने जिगरबाज खेळ केला. जयरामसाठी हा विजय सुखद ठरला. याआधी तियानकडून तो दोन्ही सामन्यांत हरला होता. आता त्याची तैवानच्या ह्‌सू जेन हाओ याच्याशी लढत होईल. 

सिंधूने इंडोनेशियाच्या दिनार द्याह आयुस्तीने हिला 31 मिनिटांत हरविले. पाचव्या क्रमांकावरील सिंधूने पहिल्या गेममध्ये पकड घेताना वेगवान खेळ केला. दिनारने दुसऱ्या गेममध्ये तुलनेने झुंज दिली, पण सिंधूने सामना फारसा लांबू दिला नाही. सिंधूने कारकिर्दीत सलग दुसऱ्या सामन्यांत दिनारला हरविले. 

साईनासाठी निकाल निराशाजनक ठरला. तिला सातवे मानांकन होते. 19व्या क्रमांकावरील तसेच बिगरमानांकित जपानची सायाका सातो तिची प्रतिस्पर्धी होती. पहिला गेम जिंकून सुरवात चांगली केल्यानंतरही साईना हरली. कारकिर्दीत आठ लढतींत तिला दुसऱ्यांदाच सायाकाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. यापूर्वी 2011 मध्ये ती हरली होती. एक तास आठ मिनिटे चाललेल्या लढतीत साईना अंतिम टप्प्यात बाजी मारू शकली नाही. 

पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला धक्का बसला. आठव्या मानांकित हॉंगकॉंगच्या एन्जी का लॉंग अँगस याच्याकडून तो हरला. एक तास एक मिनीट चाललेली लढत त्याने तीन गेममध्ये गमावली. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिकी रेड्डी यांनी अग्रमानांकित चीनच्या जोडीला दिलेली झुंज अपयशी ठरली. 

निकाल (पहिली फेरी) 
महिला एकेरी ः पी. व्ही. सिंधू विवि दिनार द्याह आयुस्तीने 21-8, 21-18 
साईना नेहवाल पराभूत वि. सायाका सातो 19-21, 21-16, 21-18 
पुरुष एकेरी ः अजय जयराम विवि तियान होऊवेई 21-18, 18-21, 21-19 
मिश्र दुहेरी ः प्रणव जेरी चोप्रा-एन. सिकी रेड्डी पराभूत वि. सिवेई झेंग-क्विंगचेन चेन 15-21, 21-14, 16-21