सिंधूची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

वृत्तसंस्था
रविवार, 27 ऑगस्ट 2017

सिंधूने शनिवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या चेन युफेईचा 21-13, 21-10 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी तिने 2013 आणि 2014 मध्ये ब्राँझपदक मिळविलेले आहे. त्यामुळे यंदा तिचे रौप्यपदक निश्चित आहे.

ग्लासगो : भारताच्या ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे तिला सुवर्णपदक मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. 

सिंधूने शनिवारी रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत चीनच्या चेन युफेईचा 21-13, 21-10 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूने प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी तिने 2013 आणि 2014 मध्ये ब्राँझपदक मिळविलेले आहे. त्यामुळे यंदा तिचे रौप्यपदक निश्चित आहे. ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागलेल्या सिंधूला सुवर्णपदक पटकाविण्याची संधी आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटू खेळणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत शुक्रवारी सिंधूने चीनच्या पाचव्या मानांकित सुन यू हिचा 21-14, 21-9 असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. सिंधूची उपांत्य फेरीत चीनची गतविजेती चेन युफेईशी गाठ पडणार होती. सिंधूने युफेईचे आव्हान 48 मिनिटांत मोडून काढत अंतिम फेरी गाठली. सुरवातीला संथ खेळणाऱ्या सिंधूने नंतर युफेईला संधीच दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर सिंधू 11-1 अशी पुढे होती. त्यामुळे तिचा विजय निश्चित झाला होता. सिंधूला आता अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी झुंजावे लागणार आहे. ओकुहाराने भारताच्याच साईना नेहवालचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.

Web Title: PV Sindhu beats Chen Yufei to reach World Badminton Championships final