थायलंड ओपनसाठी सिंधूची विश्रांती 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

महत्त्वाच्या स्पर्धेसाठी खेळाडूंनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावे यासाठी आम्ही भारतीय संघाची लवकर घोषणा केली. 
- अनुप नारंग, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस

नवी दिल्ली : आगामी थायलंड, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारत पूर्ण ताकदीचा संघ पाठवणार आहे. यातील थायलंड ओपन स्पर्धेसाठी मात्र ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

थायलंड ओपन 30 मे, इंडोनेशिया ओपन 12 जून आणि ऑस्ट्रेलिया ओपन 20 जूनपासून सुरू होणार आहे. या तीनही स्पर्धांसाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा केली. 

पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानी असलेल्या बी. साईप्रणित याच्यावर भारताच्या प्रामुख्याने आशा असतील. तंदुरुस्त झालेला पी. कश्‍यप या स्पर्धेतून पुनरागमन करेल. कश्‍यप गेल्या महिन्यात चायना ओपन स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर एका महिन्याने तो पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर परतणार आहे. 

महिला विभागात अर्थातच साईना नेहवाल आशास्थान असेल. सिंधूच्या गैरहजेरीत साईना थायलंडमध्ये दुसरे विजेतेपद मिळविण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी 2012 मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली होती. 

याखेरीज हर्षिल दाणी, सिरील वर्मा, राहुल यादव, शुभंकर डे, ईरा शर्मा, ऋत्विका शिवानी, आकर्षी कश्‍यप, रितुपर्ण दास या खेळाडूंची थायलंड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 

इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियात सिंधू, साईना दोघी खेळणार आहेत. पुरुष विभागात अजय जयराम, के. श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणित, समीर वर्मा, पी. कश्‍यप असा तगडा संघ पाठविण्यात येईल. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी ही एकमेव जोडी असेल. प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी, सुमीत रेड्डी-अश्‍विनी पोनप्पा मिश्र दुहेरीत खेळतील.