रेयाल माद्रिद विजेते बेलचे दोन गोल; लिव्हरपूलला गोलीच्या चुका भोवल्या 

champions
champions

किएव -  रेयाल माद्रिदचा बदली हुकमाचा एक्का गेराथ बेल याचे दोन चमकदार गोल आणि लिव्हरपूल गोलरक्षक लॉरिस कॅरिअस यांच्या दोन चुका यांनी चॅंपियन्स लीग लढत गाजली. रेयाल माद्रिदने या स्पर्धेवरील हुकूमत कायम राखत लिव्हरपूलचा 3-1 असा पाडाव करीत बाजी मारली. रेयाल माद्रिदचे हे सलग तिसरे, तर एकंदरीत तेरावे विजेतेपद ठरले. त्यांनी या यशासह युरोपातील आपली हुकूमत सिद्ध केली. 

बेल मैदानात उतरला, त्या वेळी एका तासाचा खेळ झाला होता आणि गोलफलक 1-1 बरोबरी दर्शवत होता. बेल हा रेयालचा हुकमी एक्का ठरेल, असे तज्ज्ञांचे मत होते आणि तसेच घडले. मैदानात उतरल्यावर तिसऱ्याच मिनिटास आणि पाचव्यांदाच चेंडूस स्पर्श करताना त्याने अफलातून बायसिकल किक मारली आणि त्यानंतर काही वेळातच दीर्घ अंतरावरून लिव्हरपूलचा गोलरक्षक कॅरिअसला चकवले. कॅरिअसने त्यापूर्वी हाताने पास केलेल्या चेंडूवर किक करीम बेनझेमाने किक करीत मारत रेयालचे खाते उघडले होते. लिव्हरपूल काय मैदानात कोणालाही त्या वेळी गोल होईल, असे वाटले नव्हते. 

वेगवान आक्रमणासाठी प्रसिद्ध असलेल्या लिव्हरपूलला रेयालने सुरवातीस गोलपासून रोखले. खरे तर या वेळीच रेयालने अर्धी लढत जिंकली. त्यातच लिव्हरपूलचा आघाडीचा गोलस्कोअरर मोहंमद सालेह याचा खांदा 31 व्या मिनिटास निखळला. खरे तर या दुखापतीने लिव्हरपूलचा कणाच मोडला. संघातील सर्वांचेच खांदे पाडले. "सर्जिओ रामोसबरोबर झालेल्या झटापटीत सालाह जखमी झाला. त्याचा संघास जबर धक्का बसला. आमचा जोषच हरपला आणि त्याचवेळी त्यांनी सूत्रे हाती घेतली,' अशी कबुली लिव्हरपूलचे मार्गदर्शक जर्गन क्‍लॉप यांनी दिली. 

मोलाच्या लढतीत प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार व्यूहरचना करण्यात, ती अमलात आणण्यात रेयाल वाक्‌बगार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. राईट बॅक दॅनी कारवाजॅल 37 व्या मिनिटास जखमी झाला, करीम बेनझेमाचा गोल उत्तरार्धात नाकारला गेला, पण त्याचा रेयालवर परिणाम झाला नाही. त्यातच लिव्हरपूल प्रतिकार करणार असे वाटले, त्या वेळी बेलला मैदानात उतरवण्यात आले. या मोसमात बेलने अनेकदा बदली खेळाडू म्हणून येत प्रभावी कामगिरी केली आहे, तरीही त्याला सुरुवातीपासून मैदानात उतरवण्यात आले नाही; पण तरीही तोच सामन्यातील ट्रम्प कार्ड ठरला. 

-ही स्पर्धा सलग तीनदा जिंकण्याचा पराक्रम रेयालने दुसऱ्यांदा केला, चार दशकांत प्रथमच 

- यापूर्वी 1976 मध्ये बायर्न म्युनिकने सलग तीनदा ही स्पर्धा जिंकली होती. 

- सलग तिसऱ्यांदा चॅंपियन्स लीग विजेत्यांचा संघाचे मार्गदर्शक होण्याचा झिनेदीन झिदान यांना बहुमान. 

- 1950 मध्ये रेयालने युरोपियन कप सलग पाच वेळा जिंकला होता. 

- रेयालचे पाच वर्षांतील हे चौथे विजेतेपद, एकंदरीत तेरावे. 

- रोनाल्डोने एकंदर पाचव्यांदा चॅंपियन्स लीग करंडक स्वीकारला. 

- सलग सातव्या अंतिम सामन्यात इंग्लंडमधील संघ स्पॅनिश संघाविरुद्ध पराजित. 

- जर्गन क्‍लॉप सातपैकी सहा अंतिम सामन्यात मार्गदर्शक म्हणून पराभूत. 

- रेयाल माद्रिदने गतमोसमात अंतिम फेरी खेळलेलाच संघ सुरवातीस उतरवला, हे स्पर्धा इतिहासात प्रथमच. 


सलग तिसऱ्यांदा विजेते झालो. काय बोलावे हेच सुचत नाही. आम्ही जे काही साध्य केले, ते आत्मसात व्हायलाच काही दिवस लागतील. मोसमात खूप चढउतार आले, त्याची सांगता विजेतेपदाने झाली, याचा आनंद आहे. 
- झिनेदीन झिदान, रेयाल माद्रिद मार्गदर्शक. 

आम्ही सामन्याची जबरदस्त सुरवात केली. सालाहच्या दुखापतीनंतर लय बिघडली. पुन्हा जम बसत असतानाच मध्यांतर झाले. विश्रांतीनंतर रेयालची आक्रमणे जास्त ताकदीने झाली. आम्ही प्रतिआक्रमणात कमी पडलो. गोलही करता आले नाहीत. 
- जर्गन क्‍लॉप, लिव्हरपूल मार्गदर्शक.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com